कोथरुडमध्ये कचरा गाडीने पार्क केलेल्या वाहनांना उडविले : एक नागरिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:22 IST2018-10-08T21:20:06+5:302018-10-08T21:22:07+5:30
शहरातला दिवसभरातील हा दुसरा भीषण अपघात ठरला आहे.

कोथरुडमध्ये कचरा गाडीने पार्क केलेल्या वाहनांना उडविले : एक नागरिक जखमी
पुणे : कचरा गोळा करणाऱ्याभरधाव टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने पादचाऱ्याला उडवत पार्किंग केलेल्या ७ दुचाकींना ठोकल्याची घटना कोथरूड परिसरात सायंकाळी घडली. यात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान शहरातला दिवसभरातील हा दुसरा भीषण अपघात ठरला आहे.
विष्णू भगवान घोरपडे (वय २५, रा. गोसावीवस्ती, कोथरूड) असे टेम्पो चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी असणारा ठेकेदाराचा हा टेम्पो आहे. दरम्यान विष्णू घोरपडे हा कचरा गोळा करून सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास गांधी भवनकडून आशिष गार्डनकडे येत होता. त्यावेळी अचानक टेम्पोचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे त्याचे टेम्पोवरील नियत्रंण सुटले. त्यावेळी प्रथम त्याने एका पादचाऱ्यास उडविले. तसेच, रस्त्याच्या कडेला लावलेल्या पार्क केलेल्या ७ दुचाकींना धडक दिली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर नागरिकांनी टेम्पो चालक विष्णू याला पकडून चोप दिला. कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विष्णू याला ताब्यात घेतले. पादचारी किरकोळ जखमीला झाला आहे. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले़ कोथरुड पोलीस अधिक तपास करीत आहेत़