HSC Exam Result 2025: महाराष्ट्रात कोकणचा झेंडा; लातूर पॅटर्न नापास, पुणे, मुंबई निकाल काय? पहा विभागनिहाय निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:39 IST2025-05-05T15:35:54+5:302025-05-05T15:39:14+5:30
वाणिज्य शाखा वगळता विज्ञान, कला आणि व्यवसाय या तिन्ही शाखेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे

HSC Exam Result 2025: महाराष्ट्रात कोकणचा झेंडा; लातूर पॅटर्न नापास, पुणे, मुंबई निकाल काय? पहा विभागनिहाय निकाल
उद्धव धुमाळे
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल साेमवारी (दि. ५) जाहीर केला असून, राज्यात पुन्हा एकदा काेकण विभागाने ९६.७४ टक्के घेत बाजी मारली आहे. सर्वात कमी अर्थात तळामध्ये लातूर विभागाचा नंबर लागला असून, ८९.४६ टक्के निकाल लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, यात गतवर्षी पेक्षा १.४९ टक्के घट झाली आहे. विशेष म्हणजे मुलांपेक्षा मुलीच हुशार, हे यंदाच्याही निकालाने स्पष्ट झाले आहे. यामध्ये मुलांच्या तुलनेत ५.०७ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षेला एकूण १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते, त्यापैकी १३ लाख ०२ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखा वगळता विज्ञान, कला आणि व्यवसाय या तिन्ही शाखेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. विशेष करून कला शाखेचा निकाल तब्बल ५ टक्क्यांनी कमी झाला आहे.
लातूर पॅटर्न नापास
राज्यात कधी काळी लातूर पॅटर्न मोठया प्रमाणावर चर्चेत आला होता. त्याचे निकालही उत्तम प्रकारे आले होते. मात्र, मागील काही वर्षांपासून लातूर विभागाच्या निकालात घट असल्याचे चित्र आहे. यंदाच्या वर्षात अपेक्षेप्रमाणे कोकण विभागात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, दुसरीकडे लातूरमध्ये सगळ्यात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मागील वर्षीच्या तुलनेत १.४९ टक्क्याची घट
बारावी परीक्षेला नाेंदणी एकूण - १४ लाख २७ हजार ०८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ लाख ०२ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाचा निकाल ९१.८८ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत १.४९ टक्क्याची घट झाली आहे. मागील वर्षी ९३.३७ टक्के निकाल लागला होता.
विभागनिहाय टक्का - यंदा - गतवर्षी
पुणे -- ९१.३२ -- ९४.४४
नागपूर -- ९०.५२ -- ९२.१२
छत्रपती संभाजीनगर -- ९२.२४ -- ९४.८०
मुंबई -- ९२.९३ -- ९१.९५
कोल्हापूर -- ९३.६४ -- ९४.२४
अमरावती -- ९१.४३ -- ९३
नाशिक -- ९१.३१ -- ९४.७१
लातूर -- ८९.४६ -- ९२.३६
कोकण -- ९६.७४ -- ९७.९१
शाखानिहाय निकाल - यंदा - गतवर्षी
विज्ञान --९७.३५ -- ९७.८२
वाणिज्य -- ९२.६८ -- ९२.१८
व्यवसाय -- ८३.२६ -- ८७.७५
कला -- ८०.५२ -- ८५.८८
शंभरटक्के निकाल लागलेले काॅलेज
यंदा - १,९२९
गतवर्षी - २,२४६
निकाल शून्यटक्के लागलेले काॅलेज
यंदा - ३८
गतवर्षी - २१
गुणवत्तेचा तक्ता
९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी - ८३५२
८५ ते ९० टक्के - २२,३१७
८० ते ८५ टक्के -४६,३३६
७५ ते ८० टक्के - ७४,१७२
७० ते ७५ टक्के - १,०३,०७०
६५ ते ७० टक्के - १,३१,८१२
६० ते ६५ टक्के - १.८१,७५५
४५ ते ६० टक्के - ६,००,२२७
उत्तीर्ण हाेणाऱ्या प्रमाण
मुली- यंदा - ६,२५,९०१ (९४.५८ टक्के) मुलांपेक्षा ५.०७ टक्के जास्त
दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
यंदा - ६,७०५ (९२.३८ टक्के)
गतवर्षी - ६,५८१ (९४.२० टक्के)
काॅपी प्रकरणे किती?
यंदा - ३६४
गतवर्षी - ३१३
१४७ विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून
बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी, विविध कारणांनी १४७ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नागपूर येथील १३७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्या खालाेखाल पुणे ६, लातूर २, काेल्हापूर १ आणि अमरावती १ यांचा समावेश आहे.