खून करून मृतदेह खोक्यात बांधून फेकला; अखेर ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली, हडपसरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 13:06 IST2024-10-14T13:06:15+5:302024-10-14T13:06:28+5:30
आर्थिक वादातून तरुणाचा खून केला, तरुणाचे हातपाय बांधून खोक्यात घालून कालव्याजवळ फेकून दिले होते

खून करून मृतदेह खोक्यात बांधून फेकला; अखेर ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली, हडपसरमधील घटना
पुणे: तरुणाचा खून करून मृतदेह खोक्यात बांधून फेकून दिल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी निजामुद्दीन पटेल (३०, रा. हांडेवाडी, हडपसर) याला अटक केली आहे. आर्थिक वादातून तरुणाचा खून केल्याचे उघडकीस आले.
इम्रान यासीन पटेल (२४, रा. उंड्री चौक, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी हडपसर भागातील हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ खोक्यात सापडला होता. त्याचे हातपाय बांधून खोक्यात घालून चिकटपट्टी लावण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून तरुणाची ओळख पटवून आरोपीला गजाआड केले. याबाबत त्याचा चुलतभाऊ आसिफ मेहबूब पटेल (२९, रा. रॉयल मॅरेज हॉलसमोर, थेऊर फाटा, गाढवे मळा, लोणीकाळभोर) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणांची माहिती घेतली. कोंढवा परिसरातून इम्रान पटेल बेपत्ता झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पटेलच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटवली. आर्थिक वादातून निजामुद्दीनने इम्रानच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार केला. यात इम्रानचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर निजामुद्दीनने त्याचे हातपाय दोरीने बांधले. एका खोक्यात मृतदेह ठेवला. हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ ते खोके टाकून तो पसार झाला हाेता. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का? या दृष्टीने तपास सुरू आहे, असे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले.