२ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण; बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 09:23 IST2025-01-09T09:23:29+5:302025-01-09T09:23:42+5:30

आरोपीला आश्रय देणाऱ्या, तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले

Kidnapping for ransom of Rs 2 crore Main mastermind in construction worker's murder case arrested | २ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण; बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत

२ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण; बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत

पुणे: सिंहगड पायथा परिसरातून शासकीय ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचे दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करणारा मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबू किसन भामे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोल्हापूर येथून अटक केली. पोळेकर खूनप्रकरणात भामे गेले दोन महिने पसार होता.

सिंहगड पायथा परिसरातील डोणजे गावातील पोळेकरवाडीत विठ्ठल सखाराम पोळेकर (७०) राहायला होते. आरोपी योगेश भामे हा डोणजे परिसरात राहायला आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्याने पोळेकर यांच्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी भामे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनी पोळेकर यांचे कारमधून अपहरण केले. तीक्ष्ण शस्त्राने त्यांच्यावर वार करून खून केला. खून केल्यानंतर अवयव खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकून दिले होते. याप्रकरणात भामे याचे साथीदार शुभम पोपट सोनवणे (२४, रा. चिंचली गुरव, जि. अहिल्यानगर) आणि मिलिंद देवीदास थोरात (२४, रा. बेलगाव, अहिल्यानगर) यांना यापूर्वीच अटक केली होती. मुख्य सूत्रधार भामे पसार झाला होता. गेले दोन महिने त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.

भामे कोल्हापूर येथे वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बुधवारी (दि. ८) पत्रकार परिषदेत दिली. पोळेकर यांच्या खुनामागचे नेमके कारण काय? फरार झाल्यानंतर तो कुठे वास्तव्यास होता? त्याला आश्रय काेणी दिला, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, सागर पवार, उपनिरीक्षक अभिजित सावंत, संजय सुलनासे, रामदास बाबर, राजू मोमीन, अतुल डेरे, अभिजित एकशिंगे, मंगेश थिगळे, अमोल शेडगे यांनी ही कारवाई केली.

आश्रयदाते होणार सहआरोपी

बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार गुंड योगेश भामे गेले दोन महिने फरार होता. त्याला आश्रय देणारे, तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

Web Title: Kidnapping for ransom of Rs 2 crore Main mastermind in construction worker's murder case arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.