Karnataka bus pulled out from parking | कर्नाटकच्या बसेसला खासगी पार्किंग मालकाने काढले बाहेर
कर्नाटकच्या बसेसला खासगी पार्किंग मालकाने काढले बाहेर

ठळक मुद्दे स्वारगेट बसस्थानकाजवळच हे पार्किंग असल्याने त्याला पसंती दररोज दिवसभर कर्नाटकच्या २० ते २२ तर रात्री सात बस या पार्किंगमध्ये उभ्या असतात...

पुणे : कर्नाटकमध्ये साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी साहित्यिकांना केलेला मज्जाव तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ स्वारगेट येथील खासगी पार्किंग मालकाने कर्नाटक सरकारच्या सर्व बस बाहेर काढल्या. मागील तीन वर्षांपासून पुण्यात येणाऱ्या बस या पार्किंगमध्ये उभ्या केल्या जात होत्या. 
स्वारगेट येथे व्होल्गा हॉटेलशेजारी एका खासगी जागेवर कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळासह (केएसआरटीसी) खासगी कंपन्यांच्या बस पार्किंग केल्या जातात. दररोज दिवसभर कर्नाटकच्या २० ते २२ तर रात्री सात बस या पार्किंगमध्ये उभ्या असतात. मागील तीन-चार वर्षांपासून हे पार्किंग सुरू आहे. स्वारगेट बसस्थानकाजवळच हे पार्किंग असल्याने त्याला पसंती मिळते. पण मागील काही दिवसांत कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनांमुळे पार्किंग मालक विश्वास चव्हाण यांनी कर्नाटकच्या बस उभ्या करण्यास मनाई केली आहे. शनिवारपासून या बस उभ्या करता येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्टपणे सर्व चालक व वाहकांना सांगितले. त्यामुळे या बसला पार्किंगसाठी जागेच्या शोधाशोध करावी लागणार आहे. 
कर्नाटकमधील इदलहोंड येथे गुंफन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेले श्रीपाल सबनीस व इतर साहित्यीकांना जाण्यास तेथील पोलिसांनी मनाई केली. त्यामुळे त्यांना संमेलनात सहभागी होता आले नाही. तर सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमातून शुक्रवारी अटक करण्यात आली. या घटनांच्या पार्श्वभुमीवर चव्हाण यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. महाराष्ट्र व कर्नाटक सीमावादाच्या मुद्दावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना बेळगावचे जिल्हाधिकारी साहित्यीकांना येण्यास मनाई करण्याची नोटीस बजावतात. ही हुकूमशाही आहे. मराठी बांधवांना त्यांच्या अधिकारापासून रोखले जात आहे. याचा निषेध करण्यासाठी कर्नाटकच्या बसला पार्किंग बंदी करण्यात आल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
------------- 
स्वारगेट आगारात ये-जा सुरू
स्वारगेट आगारामध्ये कर्नाटकच्या बस नियमितपणे ये-जा करत आहेत. तिथे त्यांना कोणतीही अडवणुक केली जात नाही. परमिट नसलेल्या बसला आगारात येऊ दिले जात नाही. आगारामध्ये बस अडविण्यावरून कोणताही गोंधळ झालेला नाही, अशी माहिती आगार प्रमुख सचिन शिंदे यांनी दिली.

Web Title: Karnataka bus pulled out from parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.