'कराडला फाशी झालीच पाहिजे', पुण्यात जनआक्रोश मोर्चा, कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:50 IST2025-01-05T13:49:52+5:302025-01-05T13:50:42+5:30
बीडमध्ये कराडसारखे गुंड कंबरेला बंदूक लावून फिरतायेत, नागरिक आता घाबरलेत, सरकारने यांची गुंडगिरी थांबवली पाहिजे

'कराडला फाशी झालीच पाहिजे', पुण्यात जनआक्रोश मोर्चा, कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
पुणे : सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुण्यात लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, मारेकरांना कठोर शिक्षा द्या, अशी घोषणाबाजी करत हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. बीड हा दहशतीचा बालेकिल्ला झाला आहे. कराडसारखे गुन्हेगार मोकाट फिरू लागले आहेत. अत्यंत वाईट प्रकारे यांची हाती करण्यात आली आहे. यामध्ये कराडचा हात आहे. त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. कराडला सध्या नुसती अटक करण्यात आली आहे. पण पुढची काहीच प्रक्रिया होताना दिसत नाहीये. बीडच्या प्रकरणाला सरकारने गांभीर्याने घ्यावे अशी विनंती यावेळी नागरिकांनी केली.
जोडे मारो आंदोलन
जनआक्रोश मोर्चामध्ये नागरिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. नागरिकांनी कराडच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केल्याचे दिसून आले. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत नागरिक आंदोलनात आक्रमक झाले होते. कराडच्या फाशीसाठी आंदोलन सुरूच राहील. असा इशाराही नागरिकांनी यावेळी दिला आहे. वाल्मिक कराडला अटक झाली आहे. परंतु त्याला तुरुंगात व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याच्या आरोपही नागरिकांनी यावेळी केला आहे.
बिहारपेक्षा महाराष्ट्र वाईट झालाय
बीडमध्ये कराडचे सहकारी 'बाप तो बाप होता है' असे स्टेटस ठेवू लागले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहेत. बीडमध्ये हे गुंड कंबरेला बंदूक लावून फिरत आहेत. ते बिहार एवढे वाईट नाही, तेवढा आता महाराष्ट्र वाईट झालाय. सरकारने यांची गुंडगिरी थांबवली पाहिजे. कराडसारख्या गुंडांमुळे सामान्य माणूसही अडचणीत आल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले आहे.