कल्याणीनगर पोर्शे कार अपघातप्रकरण; विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:34 IST2025-06-28T16:31:58+5:302025-06-28T16:34:29+5:30
बचाव पक्ष दि. २ जुलैला बाजू मांडणार; त्यानंतर आरोपींविरोधात दोषारोप निश्चित होणार

कल्याणीनगर पोर्शे कार अपघातप्रकरण; विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण
पुणे : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २२६ नुसार विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी युक्तिवाद पूर्ण करून खटल्याची संपूर्ण माहिती न्यायालयासमोर मांडली असून, त्यावर बचाव पक्षातर्फे दि. २ जुलैला बाजू मांडली जाणार आहे. त्यानंतर आरोपींविरोधात दोषारोप निश्चित होण्याची शक्यता आहे.
कल्याणीनगर येथे दि. १८ मेच्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. त्यावेळी कारचा वेग किती होता, दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू कशामुळे झाला यांसह मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून शिपाई अतुल घटकांबळेमार्फत ‘ससून’च्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीनप्रमुख डॉ. अजय तावरे या सर्व आरोपींचा कटातील सहभाग उलगडत त्यांच्याविरोधातील साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड व व्हॉट्सॲप संभाषण, डीएनए चाचणी अहवाल, आरोपींची ओळख परेड, हस्ताक्षर तज्ज्ञांचे अहवाल, रक्ताच्या नमुन्यात फेरफार कसा झाला, त्याच्या नोंदी कशा बदलल्या गेल्या, आरोपींनी एकमेकांना पैसे कसे दिले, त्यापैकी तीन लाख रुपये जप्त कसे करण्यात आले, असे तांत्रिक व दृश्य स्वरूपातील पुरावे विशेष सरकारी वकील हिरे यांनी न्यायालयात मांडले.