पुण्यात अवघ्या 19 वर्षाचा चोरटा जेरबंद; सोन्या-चांदीसह तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 21:21 IST2022-08-08T21:20:53+5:302022-08-08T21:21:02+5:30
हडपसर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करत त्याने केलेले घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणले

पुण्यात अवघ्या 19 वर्षाचा चोरटा जेरबंद; सोन्या-चांदीसह तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : हडपसरपोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करत त्याने केलेले घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या चोरट्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि सेंट्रो कार असा 12 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे या चोरट्याचं वय अवघे 19 वर्षे इतके आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
अक्षयसिंग बिरुसिंग जुनी (वय 19, रा. बिराजदार नगर वैदुवाडी हडपसर) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. सुरुवातीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या चौकशीत त्याने केलेल्या आणखी काही गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे साथीदार जीत सिंग उर्फ जितूसिंग राजपालसिंग टाक (वय 26) आणि लकीसिंग गब्बरसिंग टाक (वय 19) त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर दोन आरोपींना उस्मानाबाद कारागृहातून ताब्यात घेतले आहे. वरील तीनही आरोपींच्या पोलीस कोठडी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी गेलेल्या तीन गुन्ह्यातील तब्बल 12 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 173 ग्राम सोन्या चांदीचे दागिने आणि 728 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आहेत. त्याशिवाय त्यांनी चोरलेली सेंट्रो कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.