महायुतीत जुन्नरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार; अजित पवारच उमेदवार निश्चित करणार, आढळराव पाटलांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 17:51 IST2024-10-10T17:51:31+5:302024-10-10T17:51:31+5:30
विधानसभा निवडणूक लढविणार का? या प्रश्नावर त्यांनी मी लोकसभेसाठीच उत्सुक असल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले

महायुतीत जुन्नरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार; अजित पवारच उमेदवार निश्चित करणार, आढळराव पाटलांचे स्पष्टीकरण
पुणे : पुणे शहरात शिवसेनेला (शिंदे गट) जागा सुटणार नाही अशी चर्चा असताना शहरातील तसेच जिल्ह्यातील जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील महायुतीचे अनेक नेते पक्षबदलाच्या उंबरठ्यावर असल्याने त्या जागांबाबतही अद्याप निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले. मात्र, विद्यमान आमदार असलेल्या पक्षांकडेच जागा कायम राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे म्हाडातर्फे ६ हजार २९५ घरांच्या सोडतीचा प्रारंभ आढळराव यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा नेता या नात्याने मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रांच्या प्रचाराची जबाबदारी आहे. शहरातील तसेच जिल्ह्यातील जागांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे शरद पवारांना भेटायला गेले असले तरी महायुतीत जुन्नरची जागा ही राष्ट्रवादीकडेच राहील. अजित पवारच तेथील उमेदवार निश्चित करतील, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणूक लढविणार का या प्रश्नावर त्यांनी मी लोकसभेसाठीच उत्सुक असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
ग्रामीण भागात म्हाडाची घरे उभारणार
“पुणे पिंपरी महापालिका तसेच पीएमआरडीए क्षेत्रातही या सोडतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध झाली आहेत. ग्रामीण भागातूनही अशा पद्धतीची मागणी होत असल्याने मोठ्या नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात मोकळी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार मंचर व शिरूरमध्ये प्रत्येकी चार एकर, चाकण जवळील खराबवाडी येथे अडीच एकर आळंदी येथे पाच एकर जागा शोधली असून या संदर्भातील प्रस्ताव म्हाडाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरीतील म्हाडाच्या जुन्या वसाहतींमधील घरे मोडकळीस आली असून या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भातील प्रस्तावही तयार करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचे आढळराव पाटलांनी यावेळी सांगितले.