जुन्नर-आंबेगाव, मंचर येथील उपविभागीय अधिकाऱ्याला तब्बल २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 11:40 IST2026-03-28T11:39:37+5:302026-03-28T11:40:39+5:30
एका इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी त्यांच्या कार्यालयात तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यासाठी त्याला शिंदे याने ५ लाख रुपयांची लाच मागितली होती

जुन्नर-आंबेगाव, मंचर येथील उपविभागीय अधिकाऱ्याला तब्बल २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
पुणे/अवसरी : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंचर येथे मोठी कारवाई करत, उपविभागीय कार्यालय, जुन्नर-आंबेगाव, मंचर येथील शासकीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी याला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. गोविंद पंढरीनाथ शिंदे (वय ४६, रा. डेक्कन, मूळ रा. ता. सिन्नर, जि. नाशिक) असे लाचखोर उपविभागीय अधिकाऱ्याचे नाव आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर, आंबेगाव विभागाचा उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) म्हणून गोविंद शिंदे कार्यरत आहे. यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून, एका इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी त्यांच्या कार्यालयात तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यासाठी त्याला शिंदे याने ५ लाख रुपयांची लाच २० मार्च रोजी तक्रारदाराकडे मागितली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार २४ मार्च रोजी एसीबीकडे केली. त्यानंतर शुक्रवारी (दि. २७) एसीबीने लाच मागणी प्रकरणाची पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्याकडे २ लाखांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दुपारी तीन वाजून ३ मिनिटांनी गोविंद शिंदे याला २ लाखांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.