महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:48 IST2025-10-18T13:48:10+5:302025-10-18T13:48:47+5:30
विद्यार्थी महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असून त्यांची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येत असल्याचे कॉलेजने स्पष्टीकरण दिले आहे

महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण
पुणे : मॉडर्न कोलॅजेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने कॉलेजने आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याचा दावा करत आपल्याला ब्रिटनमधील कंपनीतील नोकरी गमवावी लागली असल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला आहे. या प्रकरणात कॉलेजने आपली बाजू मांडत हा विद्यार्थी महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. प्रेम बिऱ्हाडे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
‘महाविद्यालयाच्या प्रशासनाने जातीय भेदभाव करून व्हेरिफिकेशन केले नाही,’ असा आरोप प्रेमने केला होता. कॉलेजने सर्व आरोप फेटाळले असून, विद्यार्थ्याला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याचे सांगितले आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात उडी घेतली आहे. मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायकारक वर्तनाचा तीव्र निषेध करत वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेने कॉलेजसमोर आंदोलन केले आहे. प्रेम बिऱ्हाडे याला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी मागणी केली आहे.
प्रेम बिऱ्हाडे या विद्यार्थ्याने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये प्रेमने २०२०-२४ या कालावधीत बीबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्चशिक्षणासाठी प्रेम ब्रिटनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स’मध्ये गेला. या विद्यापीठात प्रवेशासाठी कॉलेजने विद्यापीठाला दोन पत्रे दिली. दरम्यानच्या कालावधीत प्रेमला नोकरीची संधी मिळाली. काही दिवसांनी प्रेमच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ब्रिटनमधील कंपनीने ई-मेलद्वारे कॉलेजला विचारणा केली. मात्र, कॉलेजने पडताळणीला टाळाटाळ केल्याने, स्वत: प्रेमने विभागप्रमुख, उपप्राचार्य आणि प्राचार्यांशी संपर्क साधून पडताळणी करून, प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र, प्राध्यापकांनी आपल्याला जातीबाबत माहिती विचारून, वरिष्ठांच्या आदेशावरून प्रमाणपत्र देता येणार नाही, असे सांगितल्याचा दावा प्रेमने केला आहे.
प्राचार्यांचे स्पष्टीकरण
प्रेम हा महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे प्राचार्य डॉ निवेदिता एकबोटे यांनी सांगितले आहे. त्यांची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येतात. संबंधित विद्यार्थ्याबाबत पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्यास, प्राध्यापक वर्गाचा छळ आणि महाविद्यालयाची बदनामी थांबेल,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.