पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) जानेवारीत घेतलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल मंगळवारी प्रसिद्ध केला आहे. या निकालात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९५.९३ टक्के असून, १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विशाद जैनने १०० पर्सेंटाइल गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालात पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना आता जेईई अॅडव्हान्स्डची परीक्षा द्यावी लागणार आहे. दरम्यान, जेईई मेनच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेनंतर, विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रातील परीक्षा १ ते ८ एप्रिल या दरम्यान देता येणार आहे.
आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी यांसारख्या राष्ट्रीय संस्थांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई परीक्षा वर्षातून दोन सत्रात घेण्यात येते. जेईई परीक्षेचे दोन टप्पे असतात. त्यामध्ये पहिला टप्पा जेईई मेन, तर दुसरा टप्पा जेईई अॅडव्हान्स्ड असे आहेत. जेईई मेन परीक्षेत पात्र होणारे विद्यार्थी हे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देण्यासाठी पात्र होतात. या परीक्षेतील गुणांच्या आधारे आयआयटीला प्रवेश होतात. गेल्या काही वर्षांपासून जेईई मेन परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते. या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुणांचा विचार हा विद्यार्थ्यांची रँक ठरवण्यासाठी होतो. या रँकचा वापर अॅडव्हान्स्डसाठी; तसेच देशातील अभियांत्रिकी कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी केला जातो. जेईई मेन परीक्षा जानेवारीत देशातील ३०४ शहरांमधील ६२८ परीक्षा केंद्रांवर झाली होती. याशिवाय ही परीक्षा देशाबाहेरील १५ शहरांमध्ये झाली होती. या परीक्षेसाठी १३ लाख ११ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ लाख ५८ हजार १३८ विद्यार्थ्यांनी इंग्रजीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना हा निकाल jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल, अशी माहिती एनटीएच्या प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, जेईई मेनच्या पहिल्या सत्रात ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले असतील तर विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात चांगले गुण मिळवण्याची संधी आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती एनटीएच्या प्रशासनाने दिली आहे.