आळेफाटा : रस्ता ओलांडणारा जेसीबी अचानक मध्ये आल्याने जेसीबीला दुचाकीची धडक बसली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक महिला व तरुण जखमी झाले. ही घटना जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद शिवारात आळेफाटा शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक हायवेवर मंगळवारी (दि.१७) सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडली.या अपघातात रामदास शंकर काळे (वय-५०, रा. भोजदरी ता. संगमनेर जि. अहमदनगर) यांचा मृत्यू झाला असून सिताबाई रामदास काळे (वय-४५ रा. भोजदरी, ता.संगमनेर), सिताराम शिवाजी मधे (वय-३५, रा.आंबी, ता. संगमनेर जि. अहमदनगर) हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी ज्ञानेश्वर शंकर काळे (वय-४०,रा. भोजदरी, ता. संगमनेर, जि,अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेसीबी चालकावर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी रामदास काळे,सीताराम मधे,सीताबाई काळे हे तिघे दुचाकी क्र. एम. एच. १७, सी. एन. ०३८१ वरून पुणे नाशिक महामार्गाने नाशिकच्या दिशेने जात असताना वडगाव आनंद परिसरात ते आले असता जेसीबी (क्र.यु.पी.३५ ए.टी.९७४५) चालक अविचाराने, भरधाव वेगात, रस्त्याचे नियमांकडे दुर्लक्ष करून जेसीबी रस्ता ओलांडताना दुचाकीची जेसीबीला धडक बसली. या अपघातात रामदास काळे यांचा मृत्यू झाला. अधिक तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.