"मला बाहेर बोलायचीच चोरी झालीये"; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 18:37 IST2025-03-14T18:36:14+5:302025-03-14T18:37:54+5:30
जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाची मागील तीन-चार दिवसांपासून चर्चा होत आहे. पक्षांतराच्या अनुषंगाने होत असलेल्या चर्चेवर त्यांनी आज पडदा टाकला.

"मला बाहेर बोलायचीच चोरी झालीये"; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले
शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे आझाद मैदानात आंदोलन सुरू असून, या आंदोलनात बोलताना जयंत पाटलांनी एक विधान केले. राजू शेट्टींना उद्देशून केल्या गेलेल्या या विधानाचे राजकीय अर्थ काढले गेले. त्याला सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी फोडणी दिली. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चेला आणखी हवा मिळाली. पण, या सगळ्यावर स्वतः जयंत पाटलांनी पडदा टाकला. माझं काही खरं नाही, या विधानाबद्दल त्यांनी सविस्तर खुलासा केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जयंत पाटील यांनी आज काही लोकांसोबत शरद पवारांची भेट घेतली. बारामती येथे माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. नाराज असल्याच्या चर्चांबद्दल पाटील म्हणाले, "नाराजी वगैरे काही नाहीये. कसं आहे की माझी बोलायचीच चोरी झाली आहे. मी भाषण केलेलं, त्याचा संदर्भ तुम्ही काढून बघा. शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला, त्यांच्यासमोर भाषण केलं."
जयंंत पाटील 'माझं काही खरं नाही' का म्हणाले?
"मी त्यांना सांगितलं की, कालांतराने मोबदला वाढून मिळालं की, नुकसानभरपाई घेतात आणि गप्प बसतात. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का? तुम्ही ठाम आहात का? तुम्ही शेवटपर्यंत नेणार आहात का? राजू शेट्टी हा झेंडा हातात घेतलाय म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही. तो विनोदाचा भाग होता की, राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही. आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे माझं काही तुम्ही गृहीत धरू नका. खरं धरू नका. तुमचं आंदोलन सुरू ठेवा, त्याला आमचा पाठींबा आहे, अशी ते बोलण्याची भावना होती", असा भूमिका जयंत पाटलांनी 'माझं काही खरं नाही', या विधानाबद्दल मांडली.
मला कुठेतरी ढकलायचंच ठरवलेलं दिसतंय
"मी नाराज आहे पासून ते पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली. याचं स्पष्टीकरण आझाद मैदानातून विधान भवनात आल्यावर दिलं होतं. सगळ्या प्रसार माध्यमांनी ठरवलेलं दिसतंय की, मला काही करून कुठेतरी", असे मिश्कील विधानही पाटलांनी याबद्दल बोलताना केलं.