"जयंत पाटलांच्या कानावर खेडचं प्रकरण घातलं होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही.."; संजय राऊतांचा टीकेचा बाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 18:10 IST2021-06-05T17:55:21+5:302021-06-05T18:10:00+5:30
पुणे जिल्ह्यातील खेड येथील पंचायत समितीतील फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

"जयंत पाटलांच्या कानावर खेडचं प्रकरण घातलं होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही.."; संजय राऊतांचा टीकेचा बाण
पुणे : राज्यात एकत्र असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मात्र खेडमधील फोडाफोडीच्या राजकारणावरून चांगलीच जुंपली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी पुन्हा एकदा पुण्यात खेड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
राज्यात आपण एकत्र असून समन्वयाने महाविकास आघाडी सरकार सुरु आहे. मात्र, याच दरम्यान खेडमध्ये असा प्रकार होणे योग्य नाही. हे प्रकरण पहिल्यांदा जयंत पाटलांना सांगितले होते. पण त्यांनी काहीच केले नाही. आता अजित पवारांनी तरी या प्रकरणात लक्ष घालावे अशी आमची अपेक्षा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरूनगर येथील पंचायत समितीतील राजकारण सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फोडाफोडीच्या राजकारणावरून चांगलीच जुंपली आहे. हा स्थानिक पातळीवरचा वाद अगदी वरिष्ठांपर्यंत पोहचला आहे. याचवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून थेट खेड गाठले. आणि याबाबतीत त्यांनी खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत थेट अजित पवारांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.
राऊत म्हणाले, खेड पंचायत समितीच्या सभापतींवर आलेला अविश्वास ठराव हा सरळसरळ शिवसेनेवर अन्याय आहे. सेनेचे सदस्य पळवून नेणं फोडणं हे कोणी आमिष दाखवलं? ज्यांच्याबरोबर गेले त्यांनी दाखवलं.कि अन्य कुणी ? अशी संधी आम्हांलाही मिळु शकते. पण आम्ही त्यांना त्यांच्या सरकारला समजावायला सांगू. या प्रकरणाचे आम्ही शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यापैकी कोणावरही खापर फोडलेले नाही. फक्त अजित पवारांनी या प्रकरणी लक्ष घालावे एवढीच आमची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्याना आम्ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणतो.
काय आहे प्रकरण ?
खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात दाखल केेलेला अविश्वास ठराव अकरा विरुध्द तीन अशा मतांनी मंजूर झाला .२४ मे ला सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली.मात्र या बंडखोर सदस्यांना राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार दिलीप मोहितेपाटील यांची फूस असल्याची चर्चा आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे.
अजितदादा तुमच्या आमदाराला वेसन घाला ...
खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी ते लायकीचे नाही. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. आम्ही देखील फोडाफोडीचे राजकारण करून शकतो. पण आमचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे अजितदादा तुमच्या आमदाराला वेसन घाला नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहो अथवा न राहो खेडमध्ये राष्ट्रवादीचा आमदार पाडून इथे शिवसेनेचाच आमदार असेल अशा शब्दात गर्भित इशारा दिला आहे.