नारळीकरांनी खगोलशास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात सामान्यांना समजावून सांगितला - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:57 IST2025-05-20T11:57:02+5:302025-05-20T11:57:45+5:30

एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो

jayant narlikar explained a complex subject like astronomy to the common man in very simple terms Devendra Fadnavis | नारळीकरांनी खगोलशास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात सामान्यांना समजावून सांगितला - देवेंद्र फडणवीस

नारळीकरांनी खगोलशास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात सामान्यांना समजावून सांगितला - देवेंद्र फडणवीस

पुणे: प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर झोपेतच शांतपणे अनंतात विलीन झाले. त्यांना कोणतीही दीर्घ आजारपण नव्हते, मात्र वयोमानानुसार प्रकृती काहीशी खालावली होती. त्यांच्या निधनामुळे वैज्ञानिक, साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळला आहे. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  

फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. वैज्ञानिक विषयात साहित्य निर्मिती करून विज्ञानाचा प्रसार करण्यात त्याची अत्यंत मोलाची भूमिका राहिली. त्यासाठी जागतिक पातळीवर त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले. खगोल भौतिकी क्षेत्रात त्यांनी अनेक दशके संशोधन केले. खगोल शास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात त्यांनी सामान्य वाचकांना समजावून सांगितला. वृत्तपत्रीय लेखनासोबतच मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. मराठीतून त्यांचे लिखाण ही महाराष्ट्रीयन वाचक आणि जिज्ञासूंसाठी एक मोठी पर्वणीच होती. पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांवरही त्यांनी काम केले. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.  त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

Web Title: jayant narlikar explained a complex subject like astronomy to the common man in very simple terms Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.