जुन्नरमध्ये जांबुतफाटा - बेल्हे रस्त्यावर कारची दुचाकीला धडक; ५ वर्षांची मुलगी वाचली अन् वडिलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 19:15 IST2021-07-04T19:15:26+5:302021-07-04T19:15:31+5:30
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत अपघात घडवून आणल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल

जुन्नरमध्ये जांबुतफाटा - बेल्हे रस्त्यावर कारची दुचाकीला धडक; ५ वर्षांची मुलगी वाचली अन् वडिलांचा मृत्यू
वडगाव कांदळी: जुन्नर तालुक्यातील जांबुतफाटा - बेल्हे रस्त्यावर कांदळी गावच्या हद्दीत जांबुतफाट्याजवळ कार व दुचाकीच्या धडकेत धीरज तुकाराम घाडगे रा. नगदवाडी (वय ३२वर्षे )या युवकाचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबाबत असणाऱ्या पाच वर्षीय मुलीचा जीव वाचला आहे.
शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास धीरज तुकाराम घाडगे हे आपल्या पाच वर्षाच्या मुलीसोबत दुचाकीवरून जात होते. त्यामध्ये एका कारने घाडगे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात धीरज यांच्या डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी तिथीला किरकोळ मार लागला आहे.
भरधाव वेगाने कार चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत अपघात घडवून आणल्याप्रकरणी व अपघातानंतर पळून गेल्याप्रकरणी कारचालक ज्ञानदेव शंकर गुंजाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये नबाजी लक्ष्मण घाडगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक भीमा लोंढे अपघाताचा पुढील तपास करत आहेत.