दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आल्यास आनंदच; राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:45 IST2025-05-09T11:43:40+5:302025-05-09T11:45:17+5:30
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करावं किंवा स्वतंत्र राहावे की अगदी दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण करून तिसरा पक्ष काढावा, हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आल्यास आनंदच; राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया
पुणे : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा राज्यात रंगली असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे दोन्ही गट एकत्र येत असतील तर आनंदच आहे, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.
पुण्यात सिंचन भवन येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीनंतर विखे-पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधूनअजित पवार यांचा एक गट ठरवून बाहेर पडला आहे आणि आता दोन्ही गट एकत्र येत असतील तर आम्ही आक्षेप घ्यावा असे काही नाही. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे तो त्यांनी घ्यावा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करावं किंवा स्वतंत्र राहावे की अगदी दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण करून तिसरा पक्ष काढावा, हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे. त्यांची विचारधारा नेमकी काय आहे, हे त्यांनाच विचारावे लागेल; कारण त्यांची भूमिका कोणत्या विचारधारेवर आधारित आहे, हेच मला माहीत नाही.
याच बैठकीत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर हेदेखील उपस्थित होते. त्यांना शरद पवार यांच्या विधानाबाबत विचारले असता त्यांनी, सोलापूरचे आम्ही चारही आमदार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी यासाठी जयंत पाटील यांना भेटलो होतो. तसेच पवार यांच्याशीही याविषयी बोलणे झाले होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर ताकद वाढेल, असे सांगितले. अजित पवार यांच्यावर टीका करूनही, त्यांनी मला नेहमी विकासकामांत साथ दिली. माझ्या मतदारसंघात काम केली, पाणी दिले. माझ्या मतदारसंघात कामे करताना त्यांच्या मनात कुठेही द्वेष नाही दिसला नाही. मतदारसंघात काम असतात, अडचणी असतात, त्यामुळे सरकारची गरज असतेच, असे सांगून जानकर यांनी शेवटी पवार जो निर्णय घेतील तो अंतिम असेल असे सांगितले.