Chandrashekhar Bawankule: महायुतीच्या बैठकीत ठरले, एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:26 IST2025-12-19T12:26:16+5:302025-12-19T12:26:37+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही नेते व इच्छुक आमच्याकडे येण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांची संख्या फार नाही

Chandrashekhar Bawankule: महायुतीच्या बैठकीत ठरले, एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
पुणे : महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये मित्र पक्षांच्या नेत्यांना किंवा इच्छुकांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश द्यायचे नाहीत, असे ठरले होते. तरीही काही ठिकाणी या निर्णयाचे उल्लंघन झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही नेते व इच्छुक आमच्याकडे येण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांची संख्या फार नाही, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती होणार आहे. तसेच एकमेकांच्या लोकांना घ्यायचे नाही, असे भाजप व एकनाथ शिंदे यांच्यात ठरल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात सांगितले होते. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे यांनी एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत, असे महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत ठरले आहे. मात्र, काही ठिकाणी अजित पवारांच्या नेत्यांचे प्रवेश भाजपमध्ये होणार आहेत. मात्र, त्यांची संख्या फार नाही असे म्हटले आहे. ज्या ठिकाणी आमच्याकडे जागा आहेत, त्या ठिकाणी सक्षम कार्यकर्ते पक्षात घेतले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.
राज्यातील महापालिकांची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जावी, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अजित पवार आणि आम्ही वेगळे लढणार आहोत. प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे. मात्र, ही निवडणूक लढताना मनभेद व मतभेद होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत, असेही बावनकुळे म्हणाले.
चुकीचे काम करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सरकार कोणालाही वाचवत नाही. खरेदी करताना ज्यांचे फोटो व सह्या आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. या प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी केलेली चूक अक्षम्य आहे. तसेच मावळमधील तहसीलदारांवर करण्यात आलेली कारवाई ९० हजार ब्रास अवैधपणे उत्खनन केल्याने झाली आहे. अनवधानाने झालेली चूक सरकार मान्य करेल, मात्र भ्रष्टाचारासाठी केलेली चूक सरकार मान्य करणार नाही. चुकीचे काम करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, महसूलमधील संघटनांनी अशा लोकांना पाठीशी घालू नये, असेही बावनकुळे म्हणाले. तसेच आंदोलन मागे घेतल्याबद्दल सर्व संघटनांचे आभार मानले.