ती माहिती अर्धवट आणि दिशाभूल करणारी; गंभीर घटनेवर रुग्णालय प्रशासनाची उत्तर देण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:07 IST2025-04-04T13:06:23+5:302025-04-04T13:07:04+5:30

आम्ही योग्य ती भूमिका लवकरच जाहीर करू, असे सांगून रुग्णालय प्रशासनाकडून उत्तर देण्यास टाळाटाळ

It is partial and misleading Hospital administration reluctance to respond to a serious incident | ती माहिती अर्धवट आणि दिशाभूल करणारी; गंभीर घटनेवर रुग्णालय प्रशासनाची उत्तर देण्यास टाळाटाळ

ती माहिती अर्धवट आणि दिशाभूल करणारी; गंभीर घटनेवर रुग्णालय प्रशासनाची उत्तर देण्यास टाळाटाळ

पुणे: शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. राज्यभर सर्वत्र संताप व्यक्त होत असताना रुग्णालय प्रशासन समाधानकारक पाऊल उचलत नसल्याचे दिसून आले आहे. माध्यमांनी प्रशासनाला काही प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसते आहे. 

आम्ही योग्य माहिती शासनाला दिली आहे. जी काही माहिती आपल्या समोर आली आहे. ती अर्धवट आणि दिशाभूल करणारी आहे. रुग्णालय योग्य ती भूमिका लवकर जाहीर करेल असे रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एवढ्या गंभीर घटनेनंतर रुग्णालय प्रशासन चिट्ठीचूप आहे. काहीही बोलण्यास तयार नसल्याने या घटनेबाबत अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. रुग्णालयाच्या बाहेर शिवसेना, विविध पक्ष, पतित पावन संघटना यांच्याकडून आंदोलने केली जात आहेत. 

सत्ताधाऱ्यांचे राज छत्र भक्कम पाठीशी 

दीनानाथ हॉस्पिटल यांनी मानवी दृष्टिकोनातून तरी महिलेला प्रवेश दिला पाहिजे होता. मात्र, तनिषा भिसे या गर्भवती महिलेला दाखल करून घेतले नाही ही पुणे शहरातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. दीनानाथ रुग्णालयाबाबत अशा असंख्य तक्रारी येऊनही सत्ताधाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही. हॉस्पिटलला इतका उद्दामपणा तेव्हाच येऊ शकतो जेव्हा सत्ताधाऱ्यांचे राज छत्र भक्कम पाठीशी असते.  - सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कडक कारवाई करणार 

दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाकडून १० लाख रुपये आधी भरा; त्यानंतरच रुग्णालयात प्रवेश दिला जाईल, अन्यथा नाही, असे सांगण्यात आले. गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याला पूर्णपणे दीनानाथ हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असून, यावर मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कडक कारवाई करण्यासंदर्भात मागणी करणार आहे. - अमित गोरखे, आमदार, विधान परिषद

Web Title: It is partial and misleading Hospital administration reluctance to respond to a serious incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.