शहरात कायमस्वरूपी अत्याधुनिक वाहतूक प्रशिक्षण संस्था सुरू होणे गरजेचे : अमितेश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:24 IST2025-05-15T10:23:39+5:302025-05-15T10:24:35+5:30

१ हजार वाहतूक पोलिसांना तीन महिन्यांत दिले विशेष प्रशिक्षण

It is necessary to start a permanent state-of-the-art traffic training institute in the city: Amitesh Kumar | शहरात कायमस्वरूपी अत्याधुनिक वाहतूक प्रशिक्षण संस्था सुरू होणे गरजेचे : अमितेश कुमार

शहरात कायमस्वरूपी अत्याधुनिक वाहतूक प्रशिक्षण संस्था सुरू होणे गरजेचे : अमितेश कुमार

पुणे : शहरात यापूर्वी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नव्हती. मुंबईत भायखळा येथे तेथील वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देणारे ट्रेनिंग सेंटर आहे. मी इच्छा व्यक्त केल्यानंतर, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी त्यापद्धतीने मागील तीन महिन्यांत एक हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. ही प्रशिक्षण प्रक्रिया आगामी काळातदेखील सुरू राहणार आहे.

वाहतुकीबाबत ई-लर्निंग मॉडेलदेखील वापरून परिणामकारक प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. पुण्यात कायमस्वरूपी अत्याधुनिक वाहतूक प्रशिक्षण संस्था निर्माण केली पाहिजे. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण पोलिस अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिले पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.

पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना २३ फेब्रुवारी ते १० मे या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण १८ सत्रांत विविध तज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. १०० टक्के कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (दि. १४) पोलिस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भविष्यात या प्रशिक्षणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले. वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, अजय अग्रवाल, शशिकांत पाटील, अनिल पंतोजी, प्रकाश जाधव, महादेव गावडे, अशोक शिंदे, सुरेंद्र देशमुख, मंजिरी गोखले, उर्मिला दीक्षित यांची उपस्थिती होती.

रंजन कुमार शर्मा यांनी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्किल, मोटार वाहन कायदा, वाहतूक नियमनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी याचा दैनंदिन कामात वापर करावा. नागरिकांच्या सर्वाधिक तक्रारी या वाहतूक पोलिसांबाबत असतात. पुणे शहरात अनेक ठिकाणावरून लोक येतात, पोलिसांनी त्यांच्याशी बोलताना आदबीने ‘साहेब’ म्हणून बोलावे, अन्यथा चुकीच्या वागणुकीने पुणे पोलिस दलाची प्रतिमा खराब होते. हे टाळण्यासाठी योग्य प्रकारे संवाद साधणे गरजेचे आहे, तर पोलिस दलाची प्रतिमा सुधारते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठीदेखील प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले.

मान्सूनमध्ये पूर्ण क्षमतेने वाहतूक पोलिस रस्त्यावर उतरणार

गेल्या वर्षी शहरात ज्या ठिकाणी पाणी साचले होते, झाडपडीच्या घटना घडल्या होत्या, वाहतूक कोंडी झाली होती त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा मान्सूनमध्ये वाहतूक पोलिस पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या पथकासोबत ड्रील करावी. गेल्या वर्षी ज्या समस्या उद्भवल्या त्या यंदा उद्भवता कामा नये, गरज पडेल त्यावेळी रात्री-बेरात्री वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले.

Web Title: It is necessary to start a permanent state-of-the-art traffic training institute in the city: Amitesh Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.