विश्वास पाटलांनी ‘संभाजी’ कादंबरीत केलेल्या लिखाणातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान - संभाजी ब्रिगेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 19:21 IST2025-09-26T19:20:31+5:302025-09-26T19:21:01+5:30
विश्वास पाटलांनी माफी मागून लिखाण मागे घ्यावे, अन्यथा सातारा येथील नियोजित संमेलन होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे

विश्वास पाटलांनी ‘संभाजी’ कादंबरीत केलेल्या लिखाणातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान - संभाजी ब्रिगेड
पुणे : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक विश्वास पाटिल यांच्यानिवडीवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवला आहे. पाटिल यांनी ‘संभाजी’ कादंबरीत केलेल्या लिखाणातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा करत, त्यांनी माफी मागून लिखाण मागे घ्यावे, अन्यथा सातारा येथील नियोजित संमेलन होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
संभाजी ब्रिगेडतर्फे आयोजित पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे,प्रवक्ते संतोष शिंदे चंद्रशेखर घाडगे आणि अविनाश मोहिते उपस्थित होते. ॲड. आखरे म्हणाले , छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास गौरवशाली आहे. ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. रणशूर, पराक्रमी, दूरदृष्टी असलेले राज्यकारभारी आणि विद्वत्तेच्या जोरावर शत्रूंना धडकी भरवणारे राजे होते. स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी १६ वर्षांच्या शौर्यपूर्ण लढ्यानंतर आयुष्याचे बलिदान दिले.
अशा पराक्रमी आणि विद्वान सम्राटाचे चारित्र्यहनन करण्याचा किंवा इतिहास विकृत करण्याचा कोणालाही अधिकार नाही. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या विश्वास पाटील लिखित "संभाजी" या कादंबरीत महाराजांविषयी खोटी, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक माहिती सादर केली आहे. मागील अनेक वर्षांपासून हा मजकूर ब्रिगेडने या लिखाणाला विरोध करून आक्षेप नोंदवला होता, परंतु विश्वास पाटील यांनी मजकूर दुरुस्त केला नाही. तसेच २०२५ मध्ये २१ व्या आवृत्तीचे प्रकाशन झाले असून यात कोणतीही दुरुस्ती केल्याचे दिसत नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. अशा वादग्रस्त लेखकाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनवणे म्हणजे संभाजी महाराजांच्या चारित्र्यहननाला शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे. या संदर्भात विश्वास पाटिल आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून १५ दिवसात यावर उत्तर अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अखिल भारतीय साहित्य परिषद कुठली ?
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाद्वारे साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात येते. इतर घटक संस्थांपैकी ही एक संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद संमेलन अध्यक्षपदाची निवड करत नाही तो अधिकार महामंडळाला आहे. संभाजी ब्रिगेडने सांगितल्यानुसार अखिल भारतीय साहित्य परिषदेला नोटीस पाठवलेली आहे. पण ही संस्था नेमकी कुठली? असा प्रश्न उपस्थित झाला याबाबत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना विचारले असता त्यांना कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आज पुणे येथे संभाजी ब्रिगेड या संघटनेकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली.“संभाजी” कादंबरीला मिळालेल्या लीगल नोटीसमध्ये नेमके प्रसंग दाखवलेले नाहीत. संभाजीराजांविषयी संशोधन करूनच लेखन केले असून काही चूक राहिली असेल तर ती दुरुस्त करण्यास व दिलगिरी व्यक्त करण्यास मी तयार आहे. मात्र आक्षेप स्पष्टपणे सांगावेत, अशी मागणी केली आहे. – विश्वास पाटील, निर्वाचित अध्यक्ष, ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन