रस्त्यावरील खड्ड्यात पडून घरातील कमावत्या शिक्षकाचा निष्पाप बळी; नऱ्हे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 10:11 IST2025-07-10T10:11:15+5:302025-07-10T10:11:23+5:30

पुणे महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Innocent teacher dies after falling into a pothole on the road; Incident in Narhe | रस्त्यावरील खड्ड्यात पडून घरातील कमावत्या शिक्षकाचा निष्पाप बळी; नऱ्हे येथील घटना

रस्त्यावरील खड्ड्यात पडून घरातील कमावत्या शिक्षकाचा निष्पाप बळी; नऱ्हे येथील घटना

धायरी : रस्त्यावरील खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वार शिक्षकाचामृत्यू झाला. सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे ही घटना घडली. सचिन हंगे (वय ३९, रा. धायरी) असे त्या मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी केली आहे.

सचिन हंगे हे धायरी येथील चव्हाण महाविद्यालयात शिक्षक होते. तीन दिवसांपूर्वी ते दुचाकीवरून धायरी फाटा ते नऱ्हे येथील रस्त्यावरून जात असताना सिमेंट काँक्रीट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी गेली. खड्ड्यात पाणी असल्याने तसेच खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. त्यात त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागून प्रचंड रक्तस्राव झाला. ही घटना रविवारी (दि.६) पहाटे घडली. जखमी शिक्षकाला त्वरित प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घरातील कमावता पुरुष प्रशासनाच्या चुकीचा बळी ठरल्याने प्रशासनाविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप व्यक्तीचा मृत्यू...

 नव्याने महापालिकेत समाविष्ट केलेल्या नऱ्हे परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्यानेच ह्या निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ठेकेदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून महापालिकेने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा पुणे महापालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी दिला आहे.

सचिन हंगे हे आमच्या हॉस्पिटलसमोरील असणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरून पडून त्यांचा अपघात झाला. त्यावेळी त्यांच्या कानातून प्रचंड रक्तस्राव होत होता. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. - डॉ. किरण भालेराव, प्रत्यक्षदर्शी

Web Title: Innocent teacher dies after falling into a pothole on the road; Incident in Narhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.