इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणार, एकनाथ शिंदेंची आळंदीत ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:11 IST2025-10-27T13:10:35+5:302025-10-27T13:11:02+5:30
पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळवून देण्याची सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली

इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणार, एकनाथ शिंदेंची आळंदीत ग्वाही
आळंदी: आळंदीतीलइंद्रायणी नदीला प्रदूषणमुक्त करण्याचा आणि वारकरी संप्रदायाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तीर्थक्षेत्र आळंदीला आपल्या घरासारखे मानून माऊलींच्या छायेत काम करण्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
नगरपरिषदांना वैशिष्ट्यपर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत आळंदी नगरपरिषद हद्दीत विविध विकासकामांचे भूमिपूजन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रतीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार बाबाजी काळे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे - कबीरबुवा, भावार्थ देखणे, रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपनेते इरफान सय्यद, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, शहराध्यक्ष राहुल चव्हाण, अक्षय महाराज भोसले, ज्ञानेश्वर वीर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
वारकरी संप्रदाय आणि शासनाचे जिव्हाळ्याचं नातं आहे. संत निळोबारायांनी आळंदीला भू-वैकुंठ, तर पंढरपूरला शिवपीठ म्हटले आहे. हे क्षेत्र ज्ञानपीठ आहे आणि सोन्याचा पिंपळ आजही ज्ञानाचा प्रसाद देत उभा आहे हे आपले भाग्य आहे. मुख्यमंत्री असताना तसेच आता उपमुख्यमंत्री म्हणूनही वारकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे काम करत आहे. पूर्वी ''ब'' वर्ग तीर्थक्षेत्रासाठी मंदिरांचा निधी दोन कोटींवरून थेट पाच कोटी करण्याचा निर्णय घेतला. कारण मंदिरे ही संस्कारांची केंद्रे आहेत. काही महिन्यांपूर्वी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या नावाचा मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा पुरस्कार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
आरोग्य आणि विकासकामांना चालना
मुख्यमंत्री असताना दीड लाखांपर्यंतच्या उपचारांची मर्यादा वाढवून पाच लाख रुपये केली, जेणेकरून सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे. भक्तांच्या शरीराची काळजी घेण्यासाठी सुरू केलेल्या रक्त तपासणी, मोफत औषध आणि आरोग्य केंद्रांबद्दल त्यांनी देवस्थानाला धन्यवाद दिले. पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळवून देण्याची सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.