भारतातील बहुसांस्कृतिकता आणि बहुभाषिकता ही देशाची खरी ताकद - शशी थरूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:14 IST2025-10-11T18:13:43+5:302025-10-11T18:14:17+5:30
आज आपण ज्या कथा निर्माण करू, त्या उद्याच्या भारताला आकार देतील. अल्गोरिदम आणि विश्लेषणाच्या या युगात, केवळ डेटाच आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, यावर विश्वास ठेवणे सोपे आहे

भारतातील बहुसांस्कृतिकता आणि बहुभाषिकता ही देशाची खरी ताकद - शशी थरूर
पुणे: देशात मागील काही वर्षांपासून ‘एक राष्ट्र, एक भाषा, एक निवडणूक’ याचीच चर्चा सुरू आहे. वास्तवात भारतातील बहुसांस्कृतिकता आणि बहुभाषिकता ही देशाची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारांचे अभ्यासक, खासदार डॉ. शशी थरूर यांनी केले. त्याचबराेबर शिक्षणातील विविधतेचे महत्त्व अधाेरेखित केले.
निमित्त होते, 'शब्दांची किमया, कल्पना आणि प्रेरणा' या संकल्पनेवर आधारित सिम्बायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्टस्, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ)तर्फे आयोजिलेल्या सिम्बायोसिस साहित्य महोत्सवाचे. याचे उद्घाटन शनिवारी (दि. ११) सकाळी थरूर यांच्या हस्ते झाले. विमाननगर येथील सिम्बायोसिसच्या ईशान्य सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार होते. याप्रसंगी प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, माजी राजदूत पवन वर्मा, डॉ. श्वेता देशपांडे, अनिता अग्रवाल आदी उपस्थित होते.
डाॅ. थरूर म्हणाले की, आज आपण ज्या कथा निर्माण करू, त्या उद्याच्या भारताला आकार देतील. अल्गोरिदम आणि विश्लेषणाच्या या युगात, केवळ डेटाच आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, यावर विश्वास ठेवणे सोपे आहे. परंतु डेटाला एका कथानकाची, तथ्यांना संदर्भाची गरज आहे. सत्य सांगण्याची गरज आहे. आपल्या मुलांना आपण केवळ कोडिंग शिकवू नये, त्यासाेबत सर्जनशीलता शिकवावी. कथाकथन ही चैनीची नाही तर ती आवश्यक गाेष्ट आहे. साहित्य जागतिक कल्पनांना प्रोत्साहन देते आणि आपल्या सामायिक मानवी अनुभवाला आकार देणाऱ्या विविध कथांना आत्मसात करण्यास मदत करते.
बिहारच्या निवडणुका तोंडावर असतानाही डॉ. थरूर आणि वर्मा यांनी सिंबायाेसिसला वेळ दिली याबद्दल डॉ. विद्या येरवडेकर यांनी त्यांचे आभार मानले. डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले की, लिबरल आर्ट्स कॉलेज सुरू करण्याची प्रेरणा शशी थरूर यांनी दिली. विचाराची दृष्टी व्यापक होण्यासाठी ही शाखा आवश्यक आहे. यातून आत्मविश्वास आणि धाडस प्राप्त होते. लिबरल आर्ट्स तुमचे विचार व्यापक आणि विश्वात्मक करते आणि हास सिंबायाेसिसचा डीएनए आहे. वसुधैव कुटुम्बकम या ध्येयाने आम्ही काम करत आहाेत. अभियांत्रिकी, मेडिकल असाे की अन्य... सर्वच शाखांना लिबरल आर्ट्सचे धडे दिले पाहिजे. पवन वर्मा यांनीही मनाेगत व्यक्त करून सिंबायाेसिसचे धन्यवाद मानले.