Indian Railway | मुंबई-कोल्हापूर, मुंबई कोयना एक्स्प्रेस रद्द; ट्रॅक डबलिंगच्या कामामुळे बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 19:15 IST2023-02-22T19:13:13+5:302023-02-22T19:15:48+5:30
२७ आणि २८ फेब्रुवारी दरम्यान हा बदल असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली...

Indian Railway | मुंबई-कोल्हापूर, मुंबई कोयना एक्स्प्रेस रद्द; ट्रॅक डबलिंगच्या कामामुळे बदल
पुणे :पुणे - मिरज रेल्वेमार्गावरील सातारा - कोरेगाव स्थानकादरम्यान सुरू असलेल्या रेल्वे ट्रॅक डबलिंगच्या कामामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे शेवटच्या स्थानकापर्यंत जाणार नाहीत. २७ आणि २८ फेब्रुवारी दरम्यान हा बदल असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली. रेल्वे नं. ११०२९ आणि ११०३० मुंबई - कोल्हापूर - मुंबई कोयना एक्स्प्रेस २८ फेब्रुवारीला रद्द राहणार आहे.
२७ फेब्रुवारीला रेल्वे नं. ११०४० गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस २८ फेब्रुवारीला पुण्यापर्यंतच धावणार आहे. तसेच २८ फेब्रुवारीला रेल्वे नं. ११०३९ कोल्हापूर - गोंदिया एक्स्प्रेस पुण्यावरून तिच्या नेहमीच्या वेळी गोंदियासाठी सुटेल.
२७ फेब्रुवारीला रेल्वे नं. १२७८० हजरत निजामुद्दीन - वास्को गोवा आणि २८ फेब्रुवारीला कोल्हापूर येथून सुटणारी रेल्वे नं. १२१४७ कोल्हापूर - हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस दौंड - कुर्डूवाडी - मिरज मार्गे धावेल. ही रेल्वे या दिवशी पुणे - सातारा - कराड आणि सांगली या रेल्वे स्थानकांवर जाणार नाही.
तसेच २७ फेब्रुवारीला रेल्वे नं. १६५०८ बंगळुरू - जोधपुर, रेल्वे नं. ११०९८ एर्नाकुलम - पुणे आणि रेल्वे नं. १९६६७ उदयपुर - मैसुर या एक्स्प्रेसदेखील दौंड - कुर्डुवाडी - मिरज मार्गे धावतील, अशी माहिती रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.