गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये इंदापूरचा समावेश करावा; हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 01:12 PM2023-11-05T13:12:34+5:302023-11-05T13:12:42+5:30

तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत

Indapur should be included in severe drought affected taluks Demand to Chief Minister Harsh Vardhan Patil | गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये इंदापूरचा समावेश करावा; हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये इंदापूरचा समावेश करावा; हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इंदापूर :अवर्षणप्रवण क्षेत्रात असणाऱ्या इंदापूर तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी इंदापूर तालुक्याचा समावेश गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करावा, अशी मागणी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली केली आहे.

सन २०२३ च्या खरीप हंगामाच्या परिस्थिती संदर्भात राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य शासनाने गंभीर दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या ४३ तालुक्यांची दुष्काळग्रस्त व मध्यम दुष्काळग्रस्त अश्या दोन भागात विभागणी केली आहे. २४ तालुक्यांचा गंभीर दुष्काळग्रस्त भागात तर १६ तालुक्यांचा मध्यम दुष्काळग्रस्त भागात समावेश केला आहे. त्याच्या अनुषंगाने शासनाने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्तुत्य व चांगला आहे, असे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पाटील यांनी नमूद केले आहे.

इंदापूर हा अवर्षणप्रवण भागातील तालुका आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. परिणामी गंभीर दुष्काळग्रस्त असलेल्या २४ तालुक्यांमध्ये जशी गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्याचा समावेश मध्यम स्वरूपाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात आल्याची बाब वस्तुस्थितीशी विसंगत आहे. गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यात लागू असणाऱ्या शासनाच्या सवलती जर इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाल्या तर या संकटावर मात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यात इंदापूर तालुक्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी पत्रात शेवटी केली आहे.

...तर सवलती इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतील 

इंदापूर तालुक्याचा सामावेश मध्यम स्वरूपाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे. राज्यातील गंभीर दुष्काळग्रस्त असलेल्या २४ तालुक्यांमध्ये जशी गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे, तशीच गंभीर दुष्काळी परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये असून, दुष्काळाच्या झळा इंदापूर तालुक्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना बसलेल्या आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे आतापासूनच पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले असल्याने इंदापूर तालुक्याचा समावेश हा गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यात करणेबाबत सहकार्य करावे, त्यामुळे गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांना लागू होणाऱ्या सवलती इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतील, अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

Web Title: Indapur should be included in severe drought affected taluks Demand to Chief Minister Harsh Vardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.