इंदापूर पोलिसांची धडक कारवाई, १९ लाखांचा गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 16:37 IST2024-12-28T16:35:51+5:302024-12-28T16:37:05+5:30
इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.

इंदापूर पोलिसांची धडक कारवाई, १९ लाखांचा गांजा जप्त
इंदापूर: इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईत १९ लाख ९२ हजार ६१५ रुपये किमतीचा १३२ किलो ८४१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत २ आरोपींना अटक करण्यात आली असून, २३ लाख २२ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही माहिती बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
दि. २६ डिसेंबर रोजी इंदापूर गुन्हे शोध पथकाला शेटफळ हवेली गावच्या हद्दीत एका मालवाहतूक टेम्पोमधून गांजाची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.
अटक आरोपींमध्ये नवनाथ राजेंद्र चव्हाण (३०, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) आणि शिवाजी जालिंदर सरवदे (३०, रा. निरा नरसिंहपूर, ता. इंदापूर) यांचा समावेश आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
या कारवाईत पोलिसांनी १९ लाख ९२ हजार ६१५ रुपयांचा गांजा, ३ लाख रुपये किमतीचा मारुती सुझुकी कंपनीचा नंबर नसलेला सुपर कॅरी टेम्पो, आणि ३० हजार रुपयांचे २ मोबाईल असे एकूण २३ लाख २२ हजार ६१५ रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
गुन्हे शोध पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते, फौजदार पुंडलिक गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, फौजदार दत्तात्रय लेंडवे, हवालदार सलमान खान, अंमलदार गणेश डेरे, तुषार चव्हाण, अंकुश माने, विशाल चौधर, गजानन वानोळे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
डॉ. सुदर्शन राठोड यांनी सांगितले की, “इंदापूर पोलिसांनी केलेली ही कारवाई मोठ्या गांजासाखळीचा पर्दाफाश होऊ शकतो. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.” या कामगिरीमुळे इंदापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.