महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक; ठोस उपाययोजना करा, मेधा कुलकर्णींची संसदेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:10 IST2026-03-26T12:10:33+5:302026-03-26T12:10:54+5:30
दररोज सरासरी १३२ महिला बेपत्ता होत असल्याचे आढळले आहे. मुंबई, रायगड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई यांसह पुण्यातही अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे

महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक; ठोस उपाययोजना करा, मेधा कुलकर्णींची संसदेत मागणी
पुणे: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक असून, याबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी संसदेत केली.
‘झीरो अवर’मध्ये वाढत्या मानवी तस्करीबाबत मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित करीत या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, जेणेकरून महिला व अल्पवयीन मुलींची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असे त्यांनी म्हटले.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, या समस्येचे स्वरूप अत्यंत चिंताजनक असून, गृह विभागाच्या आकडेवारीनुसार २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांत तब्बल ९३ हजार ९४० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. यापैकी २३ हजारांहून अधिक अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. दररोज सरासरी १३२ महिला बेपत्ता होत असल्याचे आढळले आहे. मुंबई, रायगड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई यांसह पुण्यातही अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातच गेल्या १५ दिवसांत १३ ते १७ वयोगटातील २० अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये मानवी तस्करीच्या संघटित जाळ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. बेपत्ता महिलांची तस्करी झाली का, त्यांना परदेशात विकले गेले का? असे गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले.