वाढती थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी ठरते पोषक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 09:00 IST2024-12-20T08:58:29+5:302024-12-20T09:00:05+5:30
शेतकरी सुखावला : गहू, हरभरा, कांदा पीक जोमात

वाढती थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी ठरते पोषक
वाल्हे : मागील काही दिवसांपासून वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन,वातावरणातील थंडी कमी झाली होती. रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली थंडी पुरेशा प्रमाणात पडत नसल्याने,गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, मका, ऊस उत्पादन शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होत असतानाच,आता वातावरणात बदल होऊन, थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने, रब्बी हंगामातील पिके घेतलेला शेतकरीवर्ग सुखावला आहे.
मागील वर्षांपासून पुरंदर तालुक्यातील दक्षिण-पूर्व भागात मॉन्सूनपूर्व व मान्सून, तसेच परतीचा पाऊस प्रमाण अल्प प्रमाणात पडला आहे. यामुळे दक्षिण-पूर्व भागातील अनेक शेतकरीवर्गाच्या खरीप हंगामातील उत्पादन मोठी घट झाली होती. यानंतर, शेतकरीवर्ग रब्बी हंगामातील पिकांपासून उत्पादन घेण्यासाठी धडपडत आहेत.मात्र, या वर्षी डिसेंबर महिन्यातील दुसरा आठवडा सुरू होऊनही देखील, रब्बी हंगामातील पिकांना पोषक थंडी पडत नसल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होता. मात्र, चार-पाच दिवसांपासून वातावरणात बदल होऊन, थंडीचे प्रमाणात वाढ होत असल्याने, शेतकरीवर्ग रब्बी हंगामातील पिकांसाठी आशावादी बनत आहेत.
या वर्षीही मान्सूनपूर्व, मान्सून पावसाने पुरंदर तालुक्यात दडी मारल्याने, तसेच परतीचा पाऊस पडला नाही तर, रब्बी हंगामातील पिकांना पाणी देताना मोठी कसरत करावी लागत असून, पाऊस अत्यल्प पडला असल्याने, या वर्षी, रब्बी हंगामातील पिकांना पोषक थंडी पडले की नाही ? याबाबत धास्ती शेतकरीवर्गाला वाटत होती.मात्र,आता पिकांना लाभदायक असलेल्या थंडीस सुरुवात झाल्याने, रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, मका आदी पिके सुस्थितीत येतील, अशी आशा शेतकरीवर्गाकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून, अचानक वाढलेली थंडी रब्बी पिकांना फायद्याची ठरत आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा सरासरी पारा घटत आहे. गार वाऱ्यामुळे पुरंदर तालुक्यात गारठा वाढला असून, वाढलेल्या थंडीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, मका या रब्बीच्या पिकांना चांगलाच फायदा होत आहे.पहाटेपासूनच वातावरणात असलेली कडाक्याची थंडी आणी दिवसभर उन्हामध्येही गारव्याची झुळूक यामुळे हुडहुडी भरत आहे.
हिवाळा सुरू झाल्यापासून यंदा तापमानात बऱ्याचवेळा चढ-उतार झाला आहे. मागील काही महिन्यांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने, थंडी गायब झाली होती, त्यामुळे तापमानात मोठे बदल झाले होते. परिणामी फारशी थंडी जाणवत नव्हती; परंतु दिवाळी सणानंतर, तापमान खाली येत असल्याने थंडी वाढत होती.
मागील काही दिवसांपासून गारठ्यामध्ये अधिकच वाढ झाली आहे. तापमानाने नीचांक गाठला असल्याने, रब्बी पिकांना या थंडीचा मोठा फायदा होईल. यात प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांची वाढ जोमाने होऊन, त्यामधील दाणे परिपक्व होण्यासाठी मदत होईल. पिकांना थंडीही पोषक ठरेल व थंडी अशीच राहिल्यास उत्पादनवाढीस याचा निश्चितच फायदा होईल. इतर पिकांमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत आला असताना काही पिकांमध्ये मात्र चार पैसे शेतकऱ्यांना मिळतील, अशी आशा शेतकरीवर्गाला आहे.
थंडीचा फळ, फुल उत्पादकांना फटका
थंडीचा कडाका मागील काही दिवसांपासून वाढला असून, यामुळे मात्र फळबागांनासह, फूल उत्पादकांना याचा फटका बसत आहे. पुरंदर तालुक्यात अंजीराचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर घेतले जाते. मात्र,थंडीचा कडाका वाढल्याने,अंजीर ''उकलत'' असून, यामुळे उकललेले अंजीर कवडीमोल बाजारभावात विकावे लागत असल्याने, अंजीर उत्पादक शेतकऱ्यांस आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच फूल उत्पादकांनाही थंडीचा फटका बसत असुन, फुले उमलण्याच्या प्रमाणात घट झाली असल्याने, फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.