राज्यघटना अभिवाचनाने महापालिकेच्या सभागृहाचे उदघाटन : अभिनव कल्पना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 18:52 IST2018-09-18T18:46:35+5:302018-09-18T18:52:57+5:30
राज्यघटनेचे अभिवाचन करून महापालिकेच्या विस्तारीत इमारतीमधील नव्या देखण्या आलिशान सभागृहाचे मंगळवारी उद्घाटन झाले.

राज्यघटना अभिवाचनाने महापालिकेच्या सभागृहाचे उदघाटन : अभिनव कल्पना
पुणे: राज्यघटनेचे अभिवाचन करून महापालिकेच्या विस्तारीत इमारतीमधील नव्या देखण्या आलिशान सभागृहाचे मंगळवारी उद्घाटन झाले. सभाह नेत्याच्या वतीने पेढे देऊन तर प्रशासानाने गुलाबपुष्प देत सर्वांचे स्वागत केले. नव्या सभागृहातही लोकशाहीतील या सर्वोच्च रचनेची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केला. विरोधकांनी यावेळी सत्ताधारी भाजपाला काही चिमटे काढत मिश्किल शेरेबाजीही केली. शहर विकासाच्या विविध विषयांवर राजकीय मतभेद विसरून काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशप्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी त्यानंतर राज्यघटनेच्या प्रास्तविकाचे वाचन केले. सुनील कांबळे, राजाभाऊ बराटे, उमेश गायकवाड, मारूती तूपे, निलिमा खाडे या स्थायी समितीच्या 5 सदस्यांनी दिलेला सभागृहाच्या उद्घाटनाचा ठराव मांडण्यात आला. तो मंजूर झाल्यानंतर भाषणांना सुरूवात झाली.
नव्या सभागृहाची रचना विधानसभागृहाप्रमाणे गोलाकार करण्यात आली आहे. सुमारे २५० आसनक्षमता आहे. संपूर्ण सभागृह वातानुकुलीत आहे. जमिनीपासून ६० फूट उंचीच्या घुमटाचे छत आहे. ध्वनीरोधक व्यवस्था सभागृहात करण्यात आली आहे. महापौर व २ आयुक्त अतिरिक्त आयूक्त, नगरसचिव यांच्यासाठी लाकडी आकर्षक व्यासपीठ व त्यासमोर गोलाकारात बैठक व्यवस्था असलेले हे सभागृह पुण्यातील अशा पद्धतीचे पहिलेच सभागृह आहे.