मराठा आंदोलनासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात लाक्षणिक उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 14:14 IST2023-09-09T14:09:58+5:302023-09-09T14:14:24+5:30
मराठा आरक्षणासाठी शिवणे ते बहुली येथील सकल मराठा समाजातर्फे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे....

मराठा आंदोलनासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात लाक्षणिक उपोषण
शिवणे (पुणे) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवली गावात मनोज जरांगे यांच्या वतीने गेल्या काहो दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात जागोजागी आंदोलने करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी शिवणे ते बहुली येथील सकल मराठा समाजातर्फे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.
उपोषणाला परिसरातील सर्वच समाजाचा पाठिंबा असल्याचे यावेळी दिसून आले. मराठा समाजाला आरक्षण दिले तर त्याचा परिणाम ओबीसी आरक्षणावर पडेल असा गैरसमज समाजात पसरवला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर त्याचा परिणाम होणार नाही ह्या दृष्टीने आरक्षण देण्यात यावे, अशी इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली. आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाच्या वतीने लाखोच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले होते. तसेच आजपर्यंत अनेकांनी आपले प्राण देखील दिले आहेत. तरीदेखील शासन आरक्षण देत नाही ही मोठी शोकांतिका असल्याचे यावेळी उपस्थित मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
उपोषणाला शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे या गावांतील मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्रिंबक मोकाशी, अनिता इंगळे, शुक्राचार्य वांजळे, संजय धिवार, प्रविण दांगट, अतुल धावडे, अमोल धावडे, निलेश वांजळे, अशोक सरपाटील, सुरेश गुजर, भगवान गायकवाड, अंकुश पायगुडे, उमेश सरपाटील, उमेश कोकरे , राकेश सावंत, दत्ता झांझे, अमोल मानकर आणि मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता.