पुण्यात 'पोलिसांचा धाक' नावाची गोष्ट आता काहीच उरलेली नाही; अंधारेंचा स्वारगेट घटनेवर संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:02 IST2025-02-26T16:01:58+5:302025-02-26T16:02:57+5:30
पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावे

पुण्यात 'पोलिसांचा धाक' नावाची गोष्ट आता काहीच उरलेली नाही; अंधारेंचा स्वारगेट घटनेवर संताप
पुणे: स्वारगेट शिवशाही प्रकरणाने शहरात संतापजनक वातावरण तयार झाले आहे. या बलात्काराच्या घटनेने मुली, तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजकीय वर्तुळातूनही पुण्याच्या सुरक्षेवर ताशेरे ओढले जात आहेत. अशातच उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. पुण्यात पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अंधारे म्हणाल्या, स्वारगेटमध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे. पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष मी वावरतेय. पंधरा वर्षांपूर्वीच पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे. दहा बारा वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बस स्टॅन्डवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली. रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे. आपण सुरक्षितपणे घरी पोहचवू ही महिलांना हमी होती. मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय. पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे. पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये.
वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत. विशेषतः शाळा, कॉलेज, बस स्टॅन्ड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे. मात्र ते होताना दिसत नाहीये. घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावे अशी अपेक्षा आहे.