Suicide: इंदापूरात सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 14:45 IST2022-01-20T14:29:54+5:302022-01-20T14:45:05+5:30
खासगी सावकारकीने आणखी एका युवकाचा जीव घेतल्याने नागरीकांतुन सावकाराच्या प्रति संताप व्यक्त होत आहे.

Suicide: इंदापूरात सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
बाभुळगाव (ता.इंदापूर) : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून इंदापूर शहरातील ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गूरूवार पहाटे पाच वाजता उघडकीस आली. विशाल दत्तात्रय गवळी (वय ३०, रा.नेताजीनगर,चाळीस फुटी रोड, इंदापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत युवकाचे चुलते उत्तम अंकुश गवळी (वय४९) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विशाल गवळी यांने आत्महत्या करण्यापुर्वी खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहुन ठेवली होती. ती चिठ्ठी पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतली आहे. विशाल याने राहत्या घरात गरूवारी पहाटे पाचच्या सुमारास खोलीतील भिंतीला लावलेल्या एका काँक्रिट खिळ्याला सुताच्या दोरीने गळफास घेतला. सदरची घटना उघडकीस आल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी त्याच्या गळ्यातील फास सोडवून उपचारासाठी उपजिल्हा रूग्णांलयामध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तर खासगी सावकारकीने आणखी एका युवकाचा जीव घेतल्याने नागरीकांतुन सावकाराच्या प्रति संताप व्यक्त होत आहे.
'सावकाराने त्रास दिल्यानेच करतोय आत्महत्या', चिठ्ठीत नमूद
''एका खासगी सावकाराकडून पन्नास हजार रूपये व्याजाने घेतले होते. सदरचे पैसे सावकाराला परत दिले होते. तरीही सावकाराने आमच्यावर केस केली. सदर पैसे देताना सावकाराने चेक व नोटरी करून घेतली आहे. त्याने खूप त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे विशालने चिठ्ठीत लिहीले आहे.''