गावांतील रस्त्यांची कामे दर्जेदार करा; कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेऊ नका, अजित पवारांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 11:54 IST2025-10-30T11:53:26+5:302025-10-30T11:54:24+5:30
पाऊस आता थांबला आहे, २०० गावांतून ही सायकलिंग स्पर्धा जाणार असल्याने त्या गावांतील पायाभूत सुविधांचाही विकास होणार आहे

गावांतील रस्त्यांची कामे दर्जेदार करा; कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेऊ नका, अजित पवारांच्या सूचना
पुणे : जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या ‘पुणे ग्रँड टूर स्पर्धे’चा लोगो, शुभंकर (मेस्कॉट) आणि जर्सीच्या अनावरणप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक करा अशा सूचना दिल्या आहेत. तर कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेऊ नका असंही त्यांनी सांगितलं आहे.
पवार म्हणाले, पाऊस आता थांबला आहे. ४३७ किलोमीटरची जागतिक स्तरावरील स्पर्धा होणार आहे. २०० गावांतून ही स्पर्धा जाणार आहे. त्या गावांतील पायाभूत सुविधांचाही विकास होणार आहे. त्यामुळे रस्त्यांचे कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक करा. कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेऊ नका. या स्पर्धेनिमित्त सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होऊन सुमारे साडेआठशे कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. या स्पर्धेमुळे ऐतिहासिक महत्त्व, सांस्कृतिक वारसा असलेल्या पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. एकेकाळी सायकलचे शहर म्हणून ओळखल्या जाणारे हे शहर काळाच्या ओघात दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जात आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुण्याला सायकलींचे शहर अशी ओळख मिळेल, अशी अपेक्षा आहे. जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या ‘पुणे ग्रँड टूर स्पर्धे’चा लोगो, शुभंकर (मेस्कॉट) आणि जर्सीच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे मनिंदर सिंग, यूसीआयचे उपाध्यक्ष अमरजीत सिंग गिल ओंकार सिंग, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, क्रीडा आयुक्त शीतल तेली उगले, झेडपीचे सीईओ गजानन पाटील, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे उपस्थित होते.
पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित होणार - देवेंद्र फडणवीस
“सायकलींचे माहेरघर असलेल्या पुण्यात होणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर स्पर्धे’मुळे येथील वैशिष्ट्यपूर्ण, धार्मिक, पर्यटन आणि सांस्कृतिक स्थळांचे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित होईल. पर्यटनाला चालना मिळून अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल. पुण्यात १९४५ नंतर आता आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेमुळे पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्रा फडणवीस यांनी सांगितले आहे.
खडसे म्हणाल्या, “ही स्पर्धा देशासाठीही महत्त्वाची ठरणार आहे. विकसित भारतामध्ये क्रीडा क्षेत्राचाही वाटा असून केंद्र सरकारच्या क्रीडा धोरणात त्या दृष्टीने बदल होत आहेत.”