'मी तुम्हाला सोडतो', वाट पाहणाऱ्या तरुणाला रिक्षाचालकाने लुटले, पुणे रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:29 IST2025-07-29T13:29:27+5:302025-07-29T13:29:37+5:30
रिक्षा चालकासह अन्य दोघांनी तरुणाला हत्याराचा धाक दाखवून मोबाइल, अंगठी, सोन्याची बाळी असा २८ हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला

'मी तुम्हाला सोडतो', वाट पाहणाऱ्या तरुणाला रिक्षाचालकाने लुटले, पुणे रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार
पुणे: रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणाला रिक्षा चालकाने सोडण्याचा बहाणा करत दोघांच्या मदतीने लुटले. ही घटना रविवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोड ते टर्फ क्लब रेसकोर्स, भैरोबानालादरम्यान घडली. याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीडी बेलापूर, मुंबई येथून रेल्वेने २४ वर्षीय तरुण कामानिमित्त शहरात आला होता. रविवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास तो रिक्षाची वाट पाहत असताना, एका रिक्षा चालकाने त्याला मी तुम्हाला सोडतो, असे म्हणून रिक्षात बसविले. त्यानंतर रिक्षा चालकासह अन्य दोघांनी तरुणाला हत्याराचा धाक दाखविला. त्यानंतर त्याचे दोन्ही हात पकडून खिशातून मोबाइल, हातातील अंगठी, कानातील सोन्याची बाळी असा २८ हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेत, आरोपींनी रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळ काढला. यानंतर तरुणाने वानवडी पोलिस ठाण्यात जात फिर्याद दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, लवकरच आरोपी पकडले जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.