हिंजवडीकडे दुर्लक्ष म्हणजे अन्याय; समस्या लवकर सुटल्या नाहीत तर आंदोलन - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:31 IST2025-07-04T16:31:15+5:302025-07-04T16:31:51+5:30
हिंजवडी परिसर महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर महसूल निर्माण करतो, त्यामुळे येथील समस्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अन्याय आहे

हिंजवडीकडे दुर्लक्ष म्हणजे अन्याय; समस्या लवकर सुटल्या नाहीत तर आंदोलन - सुप्रिया सुळे
पिंपरी : हिंजवडीची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. २६ जुलैला परत पाहणी करण्यासाठी येणार आहे. उद्योगमंत्र्यांना लवकरच बैठक घेण्याची विनंती केली आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५ जुलैला आढावा बैठक घेणार आहेत. समस्या लवकर सुटल्या नाहीत तर मी येथे येऊन आंदोलन करणार आहे. हिंजवडीचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत विलीनीकरण हा एकमेव उपाय आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
खासदार सुळे यांनी शुक्रवारी (दि. ४) हिंजवडी परिसरातील जलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि पाणीपुरवठ्याच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर संबंधित भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाहणीदरम्यान थेट शापूरजी पालोनजी समूहाचे प्रमुख शापूरजी मिस्त्री यांना फोन करून ‘जॉयविल’ प्रकल्पाशेजारील पाठक रोडवरील नागरिकांच्या तक्रारी मांडल्या. या रस्त्याचा काही भाग बिल्डरच्या मालकीचा असल्यामुळे तो सार्वजनिक वापरासाठी देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावर मिस्त्री यांनी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिल्याचे सुळे यांनी सांगितले.
महिन्यांतून दोनदा हिंजवडीची पाहणी करणार
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आयटी पार्कच्या सुरुवातीच्या काळात दर्जेदार सुविधा होत्या. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून अराजकता माजली आहे. सरकारकडून केवळ आश्वासने मिळतात, कृती शून्य आहे. मी दर महिन्याला दोन वेळा दौरा करून कामांची पाहणी करणार आहे. हिंजवडी परिसर महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर महसूल निर्माण करतो. त्यामुळे येथील समस्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अन्याय आहे.
ठाकरे एकत्र येत असतील तर आनंद
सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत ठाकरे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र आहेत. ते एकत्र आल्याने राज्याचे भले होत असेल तर आनंद आहे.