मराठी भाषेचा अवमान कराल तर याद राखा; मनसेचा राऊतांना इशारा
By राजू इनामदार | Updated: February 12, 2025 19:32 IST2025-02-12T19:31:39+5:302025-02-12T19:32:21+5:30
दिल्लीत होत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे दलाली आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे

मराठी भाषेचा अवमान कराल तर याद राखा; मनसेचा राऊतांना इशारा
पुणे : दिल्लीत होत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे दलाली आहे, असे वक्तव्य करून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अखिल मराठी मनाचा अवमान केला आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य प्रवक्ते योगेश खैरे यांनी केली. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मराठीचा हा अपमान मान्य आहे का, असा प्रश्न त्यांनी केला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला. तो देताना पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गौरवौद्गार काढले. त्याचा राग संजय राऊत यांनी मराठी साहित्य संमेलन व संयोजकांवर काढताना मराठी भाषेचाच अवमान केला, असे खैरे म्हणाले. ‘आपण म्हणजे मराठी माणूस, आपण म्हणजेच मराठी’ ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. आदल्याच दिवशी आदित्य ठाकरे महाराष्ट्र हिताच्या गप्पा मारत होते, मग आता संजय राऊत यांनी केले तेच महाराष्ट्राचे हित आहे का, असा प्रश्न खैरे यांनी केला. या अवमानाबद्दल राऊत यांनी त्वरीत समस्त मराठी जनांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
तुमचे राजकारण तुम्हालाच लखलाभ, ते हवे तेवढे करा, मात्र मराठी भाषेचा अवमान कराल तर याद राखा, असा इशाराही खैरे यांनी दिला. तुमचे मराठी प्रेम तोंड देखले आहे. हेच तुम्ही मराठीचा अवमान करून सिद्ध केले, असे खैरे यांनी म्हटले आहे. यापुढे तुमच्याकडून अशी आगळीक झाली, तर मनसे ते खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.