कोट्यवधी देऊन वसतिगृहांमध्ये असुविधा असतील, तर ठेकेदारांवर कारवाई; संजय शिरसाट यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 17:37 IST2024-12-29T17:36:41+5:302024-12-29T17:37:15+5:30
वसतिगृहांमध्ये स्वच्छतागृह नाहीत, स्वयंपाकगृह गलिच्छ, मूलभूत सुविधांचा अभाव, दारे - खिडक्या तुटक्या अवस्थेत, सुरक्षेची वानवा आहे

कोट्यवधी देऊन वसतिगृहांमध्ये असुविधा असतील, तर ठेकेदारांवर कारवाई; संजय शिरसाट यांचा इशारा
पुणे : समाजकल्याण विभागांतर्गत असलेल्या काही वसतिगृहांची स्थिती अत्यंत बिकट आहे. वसतिगृहाचा कंत्राटदार कोण आहे, कोणत्या राजकीय पक्षाशी किंवा नेत्या - मंत्र्याशी संबंधित आहे हे न पाहता, सुविधा न देणाऱ्या ठेकेदारांविरोधात थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिला.
शिरसाट यांनी पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहरातील २५० क्षमतेच्या मुलींच्या शासकीय वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुण्यातील वसतिगृहातील पाहणी केली असताना काही वसतिगृह चांगली आहेत, तर काही वसतिगृहांची सुधारणा करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
यापुढे शिरसाट म्हणाले, ‘संभाजीनगर येथील वसतिगृहाची अवस्था पाहिली, तर अंगावर काटा येईल, अशी परिस्थिती आहे. अनेक वसतिगृहांमध्ये स्वच्छतागृह नाहीत. स्वयंपाकगृह गलिच्छ आहेत. मूलभूत सुविधांचा अभाव आहे. दारे - खिडक्या तुटक्या अवस्थेत असून, सुरक्षेची वानवा आहे. बहुतांश ठिकाणी अशीच अवस्था असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व वसतिगृहांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. कोट्यवधी रुपये देऊन वसतिगृहांमध्ये असुविधा असतील, तर ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल.’
‘समाजकल्याण खात्यातर्फे विद्यार्थ्यांना योग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. काही वसतिगृहांमध्ये उणिवा निश्चितच आहेत. मात्र, अधिकाऱ्यांना दुरुस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खात्यामार्फत कोणती कामे प्रलंबित आहेत, याची माहिती घेण्यात आली असून, तातडीने कार्यवाही करण्यात येईल,’ असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. यावेळी समाजकल्याण मार्फत बार्टीचे कामकाज चालते. बार्टीच्या कामाविषयी आणि वसतिगृहातील विद्यार्थांच्या समस्या याबाबत सामाजिक संघटनांनी यावेळी समाजकल्याण मंत्री यांना निवेदनही दिले आहे.