ओबीसींचा पाठिंबा तर मग त्यांना मुख्यपद का नाही? अतुल लोंढे; इव्हीएम आंदोलन देशस्तरावर नेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:21 IST2024-12-07T13:20:47+5:302024-12-07T13:21:23+5:30
बॅलेटवर मतदान घेण्याचा सोलापूरमधील मारकरवाडीतील ग्रामस्थांचा प्रयोग सरकारने दडपशाही करून हाणून पाडला, असा आरोप त्यांनी केला.

ओबीसींचा पाठिंबा तर मग त्यांना मुख्यपद का नाही? अतुल लोंढे; इव्हीएम आंदोलन देशस्तरावर नेणार
पुणे : सत्ताधारी म्हणतात राज्यातील ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केले तसे आहे तर मग मुख्यमंत्री नाही तर दोनपैकी एका पदावरतरी ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व का दिले नाही, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. बॅलेटवर मतदान घेण्याचा सोलापूरमधील मारकरवाडीतील ग्रामस्थांचा प्रयोग सरकारने दडपशाही करून हाणून पाडला, असा आरोप त्यांनी केला.
लोंढे व अन्य काही पदाधिकाऱ्यांनी मारकडवाडीला भेट दिली व तेथील ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. त्यानंतर पुण्यात पत्रकारांबरोबर बोलताना लोंढे यांनी सरकारने त्या गावावर जबरदस्ती केल्याचे सांगितले.
माजी नगरसेवक अजित दरेकर यावेळी उपस्थित होते. पराभूत उमेदवाराला आमच्या गावातून इतकी मते पडणारच नाहीत, असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू केली. सरकारने त्याला विरोध केला. गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली, असे ग्रामस्थांनी सांगितले असल्याची माहिती लोंढे यांनी दिली. सरकार अशीच दडपशाही करणार असेल तर काँग्रेसही त्याचा प्रतिकार करेल, मारकरवाडीतील ग्रामस्थांचा लढा देशपातळीवर नेण्यात येईल, असे ते म्हणाले.
पराभूत झालेल्यांबरोबरच विजयी झालेल्यांचाही या निकालावर विश्वास नाही. जनतेचा तर नाहीच नाही. त्यामुळेच ठिकठिकाणी मतदारच असा निकाल लागणे शक्यच नाही, असे म्हणत आहेत असे लोंढे यांनी सांगितले. त्यामुळेच काँग्रेसने आता इव्हीएम विरोधात देशस्तरावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे लोंढे यांनी सांगितले.