"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:22 IST2025-07-25T12:21:57+5:302025-07-25T12:22:39+5:30

जे उमेदवार दिले ते सहा महिन्यात पक्षात राहणार नाही अशी भविष्यवाणी मी केली होती असंही वसंत मोरे यांनी रवींद्र धंगेकरांबाबत सांगितले.

"I would have been an MP from Pune today, the Congress ticket had been finalized for me"; Vasant More claims | "मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा

"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा

पुणे - लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम करत वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांनी पुणे मतदारसंघाची निवडणुकीत लढवली. या निवडणुकीत वसंत मोरे यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यानंतर काही महिन्यातच वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. वसंत मोरे यांच्या पक्षांतराची बरीच चर्चा सोशल मीडियावर कायम होत असते. त्यात वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. मी आज १०० टक्के पुण्याचा खासदार असतो असं सांगत त्यांना काँग्रेसने तिकीट फायनल केले होते असं विधान केले आहे.

एका मुलाखतीत वसंत मोरे यांनी म्हटलं की, आज कोणत्याही परिस्थितीत वसंत मोरे पुण्याचा खासदार झाला असता. मला काँग्रेसचे तिकीट फायनल झाले होते. त्यासाठी मला शरद पवार, संजय राऊत यांनी मदत केली होती. राहुल गांधी यांच्यापर्यंत मला मदत झाली होती. माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते परंतु त्यानंतर अचानक कुठे माशी शिंकली माहिती नाही. माझ्याबाबत राजकारण झाले. रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या २ दिवस आधी माझे तिकिट कॅन्सल झाले असं त्यांनी सांगितले. 

तसेच मराठा समाजाचा चेहरा भाजपाने मुरली मोहोळ यांना उमेदवारी दिली होती. मी जे काही काँग्रेसमध्ये पटवून दिले होते, त्यात मराठा विरुद्ध मराठा लढला पाहिजे तर खऱ्या अर्थाने पुण्याच्या निवडणुकीत रंगत येईल. धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार होऊ शकत नाहीत. माझा हट्ट होता. तुम्ही मला संधी द्या. काँग्रेसच्या कोअर कमिटीतील ५ पैकी ४ जणांनी माझ्या नावाला सहमती दाखवली होती. परंतु पुण्यातील काँग्रेसमधील काही नेत्यांच्या पोटात गोळा आला. या गोष्टीला वर्ष झाले. काँग्रेसच्या शहर कार्यकारणीतील काही लोकांनी मन मोठे केले असते तर आज पुणे शहरात काँग्रेसचा खासदार असता असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे.

दरम्यान, मी नरिमन पाँईटला बैठकीत सांगितले होते. जे उमेदवार दिले ते सहा महिन्यात पक्षात राहणार नाही अशी भविष्यवाणी मी केली होती. धंगेकरांना मी सांगितले होते, तुम्ही लढू नका. मी लढतो. मी जे गणित मांडले होते. त्यात साडे तीन लाखांची मते काँग्रेसला होती. २०१९ च्या निवडणुकीत ३ लाख ३६ हजार मते काँग्रेसला पडली होती. त्यातच मी भोंगा वाजवला होता. त्यामुळे पुण्यातील जे मुस्लीम मतदान होते ते माझ्यामागे उभे राहणार होते. २०१७ साली महापालिकेत शिवसेनेला साडे आठ लाख मतदान पुण्यात झाले आहे. निवडणुकीत मराठा समाज भाजपाविरोधात होता. त्यात ५० टक्के मतदान वसंत मोरेला झाले असते. महाविकास आघाडीत मित्रपक्षांनी काँग्रेसला सांगावे यासाठी मी संजय राऊत, शरद पवार यांना भेटलो होतो असंही वसंत मोरे यांनी सांगितले.   
 

Web Title: "I would have been an MP from Pune today, the Congress ticket had been finalized for me"; Vasant More claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.