तुला आता जिवंत सोडणार नाही; सेनापती बापट रोडवर कारचालकावर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 18:25 IST2025-08-03T18:24:57+5:302025-08-03T18:25:39+5:30
एका आरोपीने पृथ्वीराजच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. ‘तुला आता जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली.

तुला आता जिवंत सोडणार नाही; सेनापती बापट रोडवर कारचालकावर प्राणघातक हल्ला
पुणे : कारचालक तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकात घडली. तरुणावर वार करून आरोपी कारमधून पसार झाले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पृथ्वीराज कुमार नरवडे (१९, रा. भोसलेनगर, गणेशखिंड रस्ता), असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी महेश प्रमोद पवार (२९), रोहित अशोक धोत्रे (२४) आणि आकाश विलास कुसाळकर (३४, रा. वडारवाडी) यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज आणि आरोपी हे ओळखीचे नाहीत. शनिवारी (दि. २) दुपारी पृथ्वीराज सेनापती बापट रस्त्याने कारमधून निघाला होता. त्यावेळी आरोपी पवार, धोत्रे, कुसाळकर हे पाठीमागून त्यांच्या कारमधून आले. पुढे जाण्यास जागा न दिल्याने आरोपींनी पृथ्वीराजला शिवीगाळ करून त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी कारने त्याचा पाठलाग केला,
सेनापती बापट रस्त्यावरील गजबजलेल्या वेताळबाबा चौकात आरोपींनी कारचालक पृथ्वीराज याची कार दुपारी दीडच्या सुमारास अडवली. आरोपींनी त्यांची कार आडवी लावली. आरोपींनी पृथ्वीराज याला त्याच्या कारमधून बाहेर ओढले. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका आरोपीने पृथ्वीराजच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. ‘तुला आता जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पसार झालेले आरोपी पवार, धोत्रे, कुसाळकर यांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक शोभा भांडवलकर पुढील तपास करीत आहेत.