उपमुख्यमंत्री शिंदे जबाबदारी देतील ती मी आनंदाने स्वीकारेल; राेहित टिळकांनी थांबवले काँग्रेसचे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:41 IST2026-03-11T16:40:23+5:302026-03-11T16:41:49+5:30
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार दिला तेव्हापासून काँग्रेस नेतृत्वाने आमच्याशी अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती

उपमुख्यमंत्री शिंदे जबाबदारी देतील ती मी आनंदाने स्वीकारेल; राेहित टिळकांनी थांबवले काँग्रेसचे काम
पुणे : लोकमान्य टिळक यांचे खापर पणतू रोहित टिळक यांनी काँग्रेसचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदेसेनेकडून मला राज्यसभेच्या उमेदवारीबाबत विचारणा झाली म्हणून मी त्यादिवशी मुंबईला फॉर्म भरायलाही गेलो होतो. पण, महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे नाव आले आणि पुढचं सगळंच थांबलं. पण, तरीही भविष्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदारी देतील ती मी आनंदाने स्वीकारेल, असे रोहित टिळक यांनी सांगितले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून टिळक घराणं काँग्रेससोबत राहिले आहे. लोकमान्य टिळक हे मूळचे काँग्रेसचे होते. स्व. जयंतराव टिळक हे काँग्रेसचे खासदार आणि विधानपरिषदेचे सभापती होते. रोहित टिळक यांनी २००९ आणि २०१४ सालची कसबा विधानसभेची निवडणूक काँग्रेसमधूनच लढली आहे. रोहित टिळक हे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसही राहिले आहेत. लोकमान्य टिळकांचा वारसा असल्याने पुरस्कार देताना आम्ही कधीच पक्षीय अभिनिवेश ठेवला नव्हता; पण मध्यंतरी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार दिला तेव्हापासून काँग्रेस नेतृत्वाने आमच्याशी अंतर ठेवण्यास सुरुवात केली. टिळक परिवाराने इंदिरा गांधी, प्रणव मुखर्जी यांनाही हा पुरस्कार दिला आहे. मुळात टिळक ट्रस्ट हे राजकीय पक्ष बघून कधीच पुरस्कार देत नाही, तर संबंधित सत्कारमूर्तीचे कर्तृत्व पाहूनच हा टिळक पुरस्कार दिला जातो. मग तरीही फक्त मोदी यांच्या वेळेसच का आक्षेप घेतला गेला. खरंतर याबाबत आम्ही थेट काँग्रेस हायकमांडपर्यंत आमची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, उपयोग झाला नाही. म्हणूनच काँग्रेसचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे राेहित टिळक यांनी सांगितले.