'मी आयोजकावर कडक कारवाई करण्यास सांगणार'; अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 11:47 AM2021-06-20T11:47:48+5:302021-06-20T11:48:44+5:30

अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले.

I will ask the organizers to take strict action In Pune; Deputy CM Ajit Pawar apologizes | 'मी आयोजकावर कडक कारवाई करण्यास सांगणार'; अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी

'मी आयोजकावर कडक कारवाई करण्यास सांगणार'; अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी

Next

पुणे: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाली. अजित पवारांच्या उपस्थितीतील ही तोबा गर्दी कोरोनाचे संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळेच, विरोधकांनीही या कार्यक्रमावरुन राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली.

अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवारांना येथील गर्दी विषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यासाठी मी पोलिसांना सांगणार आहे. अजित पवार पुढे म्हणाले की,  गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्यांचा हिरमोड झाला असता, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, असं पवार अजित म्हणाले. दिमाखदार कार्यक्रम होत असताना तुम्ही नियम पाळले नाहीत त्यामुळे मनात खंत वाटते, असं कार्यकर्त्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले. 

एकीकडे पुण्यात शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे, गर्दी टाळणे आणि सार्वजनिक कार्यक्रम न घेणे हे सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीतील कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याने महाविकास आघाडी सरकारवरही टीका होत आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन अतिशय साध्या पद्धतीने ऑनलाईन बैठक घेऊन साजरा केला. मात्र राष्ट्रवादी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करुन कोरोना संक्रमणाचा धोका वाढणण्यास कारणीभूत ठरु शकते.

दरम्यान, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला गेला. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली.  कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं चित्रं पाहायला मिळालं.  अजितदादा नेहमी गर्दी टाळण्याचे आवाहन करत असताना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला मात्र तुफान गर्दी पाहायला मिळाली. 

पुणेकरांच्या संकटात भर टाकणारी गर्दी- भाजपा

भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गोळा केलेली गर्दी ही पुणेकरांच्या संकटात भर टाकणारी आहे. तसेच या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियमांची पायमल्ली करत जगताप यांनी गोळा केलेली गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रित करणारी आणि पुणेकरांच्या जीवाशी खेळणारी आहे. एकीकडे शेकडो वर्षांची शिस्तबध्द परंपरा असणाऱ्या वारकरी संप्रदायाला पायी पालखीसाठी परवानगी नाकारणे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बेशिस्तीचे प्रदर्शन करणे बेजबादारपणाचे आहे. असे आयोजन टाळायला हवे होते. यांच्या चमकोगिरीमुळे खुद्द अजितदादांना दिलगिरी व्यक्त करावी लागली असेही मुळीक यांनी यावेळी म्हटले आहे

Web Title: I will ask the organizers to take strict action In Pune; Deputy CM Ajit Pawar apologizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.