मी कोयता वरच्या वर पकडून बॅग अंगावर फेकली; धाडसी तरुणाने सांगितला सदाशिव पेठेतील घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 17:20 IST2023-06-27T17:08:11+5:302023-06-27T17:20:06+5:30
तरुणी मदतीसाठी हाक मारत असताना कुणीच तिच्या मदतीला आलं नाही, तो तिच्यावर वार करणार तेवढ्यात मी त्याचा कोयता वरच्या वर पाकसुन बॅग अंगावर फेकली

मी कोयता वरच्या वर पकडून बॅग अंगावर फेकली; धाडसी तरुणाने सांगितला सदाशिव पेठेतील घटनाक्रम
पुणे : पुण्याच्या सदाशिव पेठेतील तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला. या थरारक घटनेने नागरीकातून संताप व्यक्त होऊ लागला आहे. दर्शन पवारच्या ताज्या प्रकरणानंतर लगेचच अशी घटना घडल्याने मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला झाला तेव्हा तिला वाचवायला लवकर कोणी आले नाही. अशावेळी एका धाडसी तरुणाने न घाबरता तरुणीला वाचवले आहे. मी कोयता वरच्या वर पकडून बॅग अंगावर फेकल्याचे तरुणाने सांगितले आहे.
या धक्कादायक घटनेत तरुणी आणि तिचा मित्र गाडीवरून जाताना दिसत आहेत. त्यावेळी अचानक आरोपी तरुण त्यांच्या शेजारी येऊन अडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचेही व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. गाडीवरचा तरुण लगेच उतरून आरोपी तरुणाला ढकलताना दिसून आले आहे. तेवढ्यात आरोपीने कोयता काढून वार करण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी मुलीबरोबर असणारा तरुण आरोपीपासून लांब गेला आहे. आणि आरोपी कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावत जाताना दिसत आहे. पुढे जाऊन आरोपीने तरुणीवर प्राणघातक हल्लाही केला आहे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. हे घडत असताना आजूबाजूच्या नागरिकांनी तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुण जोरजोरात कोयता फिरवू लागला. त्यावेळी हा तरुण धावून आला. आणि त्याने जीवाची परवा न करता आरोपी तरुणाशी सामना केला.
"मी अभ्यासिकेत जाताना मला हा आरोपी तरूण तरूणीवर हल्ला करताना दिसला. मग तो तिच्या पाठीमागे पळत होता. ती पुढे जाऊन खाली बसली आणि मदतीसाठी हाक मारत होती पण कुणीच तिच्या मदतीला आलं नाही. तो तिच्यावर वार करणार तेवढ्यात मी त्याचा कोयता वरच्या वर पकडला आणि बॅग त्याच्या अंगावर फेकली. त्यानंतर माझ्या मदतीला एकजण आला आणि आम्ही दोघांनी पकडून त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं असल्याचे तरुणीला वाचवलेल्या तरुणाने सांगितले आहे.''