हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन भटक्या विमुक्तांचा आदिवासी समाजात समावेश करा - लक्ष्मण माने
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 11:31 IST2025-09-05T11:31:43+5:302025-09-05T11:31:53+5:30
गुजरात कर्नाटक, आंध्र या राज्यांमध्ये या जमातींना आदिवासी प्रवर्गात दाखवले आहे. आम्हीही मागील ५० वर्षांपासून तीच मागणी करत आहोत. मात्र, आम्हाला तसे करता येत नाही, असेच सांगितले जात आहे.

हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन भटक्या विमुक्तांचा आदिवासी समाजात समावेश करा - लक्ष्मण माने
पुणे: ज्या हैदराबाद गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण दिले, त्याच गॅझेटचा आधार घेऊन आम्हा भटक्या विमुक्तांचा आदिवासी समाजात समाविष्ट करा, अशी मागणी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष, ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी केली. या मागणीसाठी १० सप्टेंबरपासून मुंबईत आझाद मैदानात उपोषण सुरू करण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना माने म्हणाले, आमच्या ४२ जमाती आहेत. त्यात कैकाडी रामोशी, वडार, कंजारभाट, लमाण, बंजारा, भामटा अशा १४ जाती विमुक्त जमाती व वैदू, कोल्हाटी, गोसावी, भोईर, नंदीवाले अशा २८ ते ३७ भटक्या जमाती आहेत. ते बलुतेदार नाहीत, तरीही त्यांना ओबीसीमध्ये दाखविले आहे. गुजरात कर्नाटक, आंध्र या राज्यांमध्ये या जमातींना आदिवासी प्रवर्गात दाखवले आहे. आम्हीही मागील ५० वर्षांपासून तीच मागणी करत आहोत. मात्र, आम्हाला तसे करता येत नाही, असेच सांगितले जात आहे.
हैद्राबाद गॅझेटनुसार आम्हालाही आरक्षण द्या
मुंबईत आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाला त्यांच्या मागणीप्रमाणे कुणबी आरक्षण देताना सरकारने हैदराबाद गॅझेटचा आधार घेतला. त्यातील नोंदीनुसार प्रमाणपत्र दिले जाईल, असे सांगितले. याच हैदराबाद गॅझेटमध्ये आमच्या ४२ जमातींची नोंद आदिवासी म्हणूनच आहे. मग आता आम्हालाही याच गॅझेटचा आधार घेऊन कायदेशीर प्रमाणपत्र द्या, असेही माने म्हणाले.