पतीचा पगार जास्त! सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 19:42 IST2025-05-13T19:42:39+5:302025-05-13T19:42:58+5:30

पतीला जरी चांगला पगार मिळत असला, तरी तो आईचा व मुलीचा संपूर्ण खर्च करत आहे, पत्नी स्वतःच्या पगारातून उदरनिर्वाह करू शकते

Husband salary is high Wife who works in a government job denied alimony, important decision of the court | पतीचा पगार जास्त! सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पतीचा पगार जास्त! सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे: पत्नीची सरकारी, तर पतीची खासगी कंपनीत नोकरी. केवळ पतीला पगार जास्त आहे, म्हणून त्याच्याकडे ५० हजार रुपये पोटगी मागणाऱ्या पत्नीची मागणी न्यायालयाने फेटाळली. पती हा मुलगी आणि आईचा सांभाळ करत आहे. पत्नीला चांगला पगार आहे. त्यातून ती स्वतःचा व्यवस्थित सांभाळ करू शकते. केवळ पतीला पगार जास्त आहे, म्हणून पोटगी मागणे योग्य नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांनी हा आदेश दिला.

राकेश आणि स्मिता (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. १५ वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला. दोघांना १० वर्षांची मुलगी आहे. पती हा मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. त्याला दरमहा लाख रुपये पगार आहे. तर, पत्नी ही सरकारी नोकरी करते. तिलाही पगार चांगला आहे. मात्र, कालांतराने दोघांचे पटेनासे झाले. त्यामुळे पतीने ॲड. शीतल चरखा भट्टड यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. नोटीस मिळाल्यानंतर पत्नी न्यायालयात हजर झाली. तिने दरमहा ५० हजार रुपये पोटगीची मागणी केली. पत्नीला मिळणाऱ्या पगारातून दरमहा गृहकर्जाचा मोठा हप्ता जातो. पोलिस सोसायटीतून घेतलेल्या कर्जाचा हप्ताही भरावा लागतो. त्यामुळे तिला जरी पगार असला, तरी शिल्लक पगारावर तिला व मुलीचा उदरनिर्वाह भागत नाही. त्यास ॲड. शीतल चरखा भट्टड यांनी युक्तिवादातून विरोध केला. पत्नीने स्वतःसाठी कर्ज घेतले आहे. पतीला जरी चांगला पगार मिळत असला, तरी तो आईचा व मुलीचा संपूर्ण खर्च करीत आहे. तिच्या पगारातून ती स्वतःचा उदरनिर्वाह करू शकते. या युक्तिवादानंतर न्यायालयाने पत्नीचा पोटगीचा अर्ज फेटाळून लावला.

 

Web Title: Husband salary is high Wife who works in a government job denied alimony, important decision of the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.