हुंडा मागुन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नवरा व सासू सासरे यांना कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:36 IST2025-02-04T14:35:32+5:302025-02-04T14:36:38+5:30
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली.या गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता.

हुंडा मागुन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नवरा व सासू सासरे यांना कारावास
लोणी काळभोर : हुंडा मागून वारंवार त्रास देणाऱ्या सासरच्या मंडळींना कंटाळून एका विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गंगानगर परिसरात २०१२ मध्ये घडली होती. या प्रकरणात विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला १० वर्ष, तर सासू-सासऱ्यांना प्रत्येकी ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे.पती नवनाथ पांडुरंग तकमोगे, सासरे पांडुरंग भानुदास तकमोगे व सासू रुक्मिणी पांडुरंग तकमोगे अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अंजना नवनाथ ताकमोगे (वय २०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील विठ्ठल प्रल्हाद मोरे (वय ४९) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजना व आरोपी नवनाथ तकमोगे यांचा २०१० मध्ये विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर काही दिवस चांगले गेले. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी अंजना यांना त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नात व्यवस्थीत मानपान दिला नाही व प्लॉट घेण्याकरीता ३ लाख रूपये माहेरकडून आणले नाहीत. तसेच लग्नात ठरल्याप्रमाणे राहिलेले १ लाख रुपयांचा हुंडा द्यावा, असे वेळोवेळी टोचून बोलत अनुजा यांना मारहाण केली.दरम्यान, एवढ्यावरच न थांबता सासरच्या मंडळींनी अनुजा यांना घराबाहेर काढले. तिचा शारीरीक व मानसिक छळ केला. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनुजा यांनी राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतुन पेटवून घेत आत्महत्या केली. अनुजा यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती नवनाथ तकमोगे, सासरे पांडुरंग तकमोगे व सासू रुक्मिणी तकमोगे यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली.या गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता.
या खटल्यात सरकारच्या वतीने अॅड. प्रदीप गेहलोत यांनी कामकाज पाहिले. सरकारी वकील अॅड. गेहलोत यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी नवनाथ तकमोगे याला ३ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी कैद, तसेच ७ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर पांडुरंग तकमोगे व रुक्मिणी तकमोगे यांना ३ वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद, अशी शिक्षा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश ए. आय. पेरंपल्ली यांनी सुनावली आहे.पुणे शहर पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांचे प्रोत्साहन व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ललिता सिताराम कानवडे यांनी न्यायालयीन कामकाजात सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांना बहुमुल्य मदत केली.