पोलिसांशी हुज्जत; शेतकऱ्यांना दमदाटी, मनोरमा यांना ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 15:17 IST2024-07-18T15:16:54+5:302024-07-18T15:17:32+5:30
मनोरमा यांना अटक केल्यानंतर कोर्टात हजर केले असता पोलिसांनी मागितली ७ दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांशी हुज्जत; शेतकऱ्यांना दमदाटी, मनोरमा यांना ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
पुणे : आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात खेडकर कुटुंबाचे एकेक कारनामे उघड होऊ लागले होते. या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. मनोरमा यांच्याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ऑडी कारची नोटीस देण्यासाठी घरी गेलेल्या पोलिसांनाही मनोरमा यांनी वाद घालत दमदाटी केली होती. तर बाणेर येथील बंगल्याबाहेर मेट्रोच्या कामात मनोरमा खेडकरांनी अडथळा आणल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यातही त्या पोलिसांशी अरेरावी करताना दिसून आल्या आहेत. आता कोर्टात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली आहे.
पूजा खेडकर यांनी मनमानीकरत आपल्या ऑडी कारला अंबर दिवा लावला. तसेच गादीवर शासनाची पाटी लावली. याप्रकरणी पोलीस पूजा खेडकर यांच्या घरी ऑडी कारची तपासणी करण्याकरिता गेले होते. त्यावेळी त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांची हुज्जत घातली. तुम्हाला आतमध्ये घालेन अशी धमकी देत दमदाटी केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर मनोरमा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आला. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना बंदूक दाखवत धमकवण्याचा व्हिडिओ प्रसारित झाला. मुळशी तालुक्यात मनोरमा यांनी जमीन खरेदी केल्यानंतर जेवढी जमीन घेतलियेब त्यापेक्षा जास्त जमिनीवर ते दावा करू लागले. या प्रकरणात शेतकऱ्यांनी मध्यस्थी केली असता मनोरमा यांनी बंदुकीच्या धाकाने त्यांना धमकावले. तर २ वर्षांपूर्वी मेट्रोच्या कामात मनोरमा खेडकरांनी अडथळा आणल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यातही त्या पोलिसांशी अरेरावी करताना दिसून आल्या आहेत. पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या समोर गेल्या काही काळापासून मेट्रोच काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी खेडकर यांच्या बंगल्यासमोरील फुटपाथवर ठेवले होते. त्यावरून मनोरमा खेडकर यांनी मेट्रो कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू केला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तिथे पोहचले. मात्र मनोरमा खेडकर यांनी त्यांच्याशी देखील वाद घातला.
तीन प्रकरणे मनोरमा यांना भोवली
पूजा खेडकर यांना मुजोरीपणामुळे अनेक गोष्टींना उत्तर द्यावे लागले. त्यांची पुण्यातून वाशीमला बदली केली गेली. शिवाय मसुरीतून त्यांना प्रशिक्षण थांबवण्याची सूचना आली. हे सर्व घडत असताना मनोरमा यांचे एक एक कारनामे समोर येत होते. आपल्या मुलीची सरकारी चौकशी सुरु असताना मनोरमा अरेरावी करताना दिसून आल्या. अखेर एका मागोमाग मनोरमा यांचे तीन कारनामे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले. त्यांनंतर मनोरमा खेडकर या पसार झाल्या होत्या. पौड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्यांची शोधमोहीम सुरु केली. अखेर महाड मधून त्यांना अटक करण्यात आली. मनोरमा यांना तिन्ही व्हिडिओची प्रकरणे चांगलीच भोवली असल्याचे दिसून आले आहे. कोर्टात पोलिसांनी त्यांना ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.