व्यवहार नेमका कसा झाला? शीतल तेजवानीकडून ३०० कोटींच्या व्यवहाराबाबत पोलिसांचीच दिशाभूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 20:06 IST2025-12-11T20:05:22+5:302025-12-11T20:06:03+5:30
अमेडिया कंपनीशी कसा संपर्क झाला? तिने कोणाच्या ओळखीने जमिनीचा व्यवहार केला, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.

व्यवहार नेमका कसा झाला? शीतल तेजवानीकडून ३०० कोटींच्या व्यवहाराबाबत पोलिसांचीच दिशाभूल
पुणे: मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीच्या बँका खात्यात ३०० कोटी रुपयांचे व्यवहार झालेले दिसत नाही. तिने ही रक्कम रोखीने घेतली का? किवा हा व्यवहार नेमका कसा झाला याबाबत ती पोलिसांची दिशाभूल करत आहे. तिचा ‘अमेडिया इंटरप्रायझेस एलएलपी कंपनी’शी कसा संपर्क झाला. तिने कोणाच्या ओळखीने जमिनीचा व्यवहार केला, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी (ता. ११) न्यायालयाला दिली.
शीतल तेजवानी (४४ वर्षे, मुळ रा. ३०५, ३ रा मजला, तुलसियानी चेंबर्स, नरिमन पॉइंट, मुंबई, सध्या राहणार बी ९०१, ऑक्सफर्ड हॉलमार्क, लेन नंबर ७, कोरेगाव पार्क) हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तीन डिसेंबरला अटक करण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तिला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
जमिनीचा कब्जा हक्काचा सारा भरण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात भरलेला ११ हजार रुपयांचा डीडी कोणाच्या सांगण्यावरून भरला हे तेजवानी हिने अद्याप सांगितलेले नाही. तिच्या घरझडतीमध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने कागदपत्रे मिळून आलेले नाहीत. त्यामुळे तिचे इतर ठिकाणी घर किंवा कार्यालय असण्याची दाट शक्यता आहे. तेजवानी दोन मोबाइल नंबर वापरत असून त्यातील एक नंबर एका वकील महिलेच्या नावाने नोंदवलेला आहे, अशी माहिती तपास अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय वाघमारे यांनी न्यायालयास दिली.
कोठडीत १५ डिसेंबरपर्यंत वाढ..
तेजवाणीकडून २००६ मधील ३३ नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र व २००८ मधील ४५ रिव्होकेबल कुलमुखत्यार हस्तगत केलेल्या आहेत. २००६ मधील कुलमुखत्यारमध्ये वतनदार यांचे १४४ वारसदारांची नावे समाविष्ट आहेत तर २००८ च्या ४५ रिव्होकेबल कुलमुखत्यारामध्ये वतनदार यांचे २३९ वारसदारांची नावे समाविष्ट आहेत. तिने केलेल्या खरेदी-विक्री दस्तामध्ये एकूण २७२ वारसदार यांच्यावतीने कुलमुखत्यार म्हणून खरेदी खत केलेले आहे. त्यामुळे तिने संपूर्ण २७२ वारसदार यांचे कुलमुखत्यार दिलेले नाहीत. उर्वरित कुलमुखत्यार तिने कोठे ठेवल्या आहे? त्याचे काय केले? याबाबत तपास करून त्या हस्तगत करण्यासाठी तिच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अमित यादव यांनी केला. बचाव पक्षाच्यावतीने ॲड. प्रवण पाटील यांनी युक्तिवाद केला.
याचा होणार तपास...
- विक्री केलेली जमीन मुंढवा हद्दीतील असताना त्याची नोंदणी बावधन येथील हवेलीत का करण्यात आली?
- गुन्ह्याचा कट कसा रचण्यात आला व त्यात कोण-कोण सहभागी आहेत?
- वतनदारांच्या वारसांना दिलेली रक्कम तेजवानी हिने कोणाकडून घेऊन दिली?
- तेजवानीने यापूर्वी केलेल्या व्यवहारांत अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का?